परभणीत कापसाला दुष्काळी फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:36 PM2019-01-15T23:36:52+5:302019-01-15T23:40:24+5:30
जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका कापसाच्या बाजारपेठेला बसला असून, आवक होत नसल्याने जिनिंग प्रेसिंग व्यापारी चिंतेत आहेत़ मागील दोन वर्र्षांची तुलना करता यावर्षी सुमारे २० हजार मे़ टनाने कापसाची आवक घटली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका कापसाच्या बाजारपेठेला बसला असून, आवक होत नसल्याने जिनिंग प्रेसिंग व्यापारी चिंतेत आहेत़ मागील दोन वर्र्षांची तुलना करता यावर्षी सुमारे २० हजार मे़ टनाने कापसाची आवक घटली आहे़
खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन ही दोन नगदी पिके म्हणून ओळखली जातात़ शेतकरी कापसाच्या लागवडीवर भर देतो़ इतर पिकांच्या तुलनेत कापूस उत्पादनातून लवकर पैसा मोकळा होत असल्याने पांढरं सोनं म्हणून या कापसाकडे पाहिले जाते़ मात्र यावर्षी कापसानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे़ मागील वर्षी जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीने बाधित झाला होता़
परिणामी उत्पन्नात घट झाली़ यावर्षी देखील शेतकºयांनी धोका पत्कारून कापसाची लागवड केली़ काही भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत असला तरी सर्वाधिक फटका बसला तो परतीच्या पावसाचा. पाऊस वेळेवर न झाल्याने कापसाची वाढ खुंटली़ सर्वसाधारणपणे एक ते दोन वेचण्यातूनच शेतकºयांना कापसाचे उत्पादन मिळाले आहे़
नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यामध्ये कापूस विक्रीसाठी दाखल झाला आहे; परंतु, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक घटल्याने व्यापारी चिंतेत आहेत़ परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत १३१ गावांमधील कृषी मालाची खरेदी-विक्री होते़ कापूस खरेदीतून बाजार समितीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते़ मात्र यावर्षी बाजार समिती अंतर्गत आवक घटली आहे़
२०१६-१७ मध्ये परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे ६६ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती़ तर मागीलवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव असतानाही ५८ हजार क्विंटल कापूस बाजार समितीत डिसेंबर महिन्यापर्यंत दाखल झाला होता़ यावर्षी मात्र डिसेंबर अखेर केवळ ४० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे़ सर्वसाधारपणे ५ हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव कापसाला मिळत असतानाही आवक मात्र घटली आहे़ मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी तब्बल २० हजार क्विंटल कापूस कमी विक्रीसाठी आला़ त्याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावर झाला असून, जिनिंग, प्रेसिंग व्यवसायिकही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत़ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये एकीकडे कृषी बाजारपेठ ठप्प असताना दुसरीकडे जिनिंग व्यावसायिकांनाही फटका सहन करावा लागत आहे़
ई-नामचा कापूस विक्रीवर अडथळा
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणाली लागू झाली आहे़ या प्रणाली अंतर्गत बाजार समितीत येणाºया प्रत्येक मालाची खरेदी-विक्री आॅनलाईन पद्धतीने केली जाते़ खरेदी केलेल्या मालाचे पेमेंटही थेट शेतकºयाच्या खात्यावर जमा होते़ यासाठी सर्वसाधारणपणे आठ दिवसांचा काळ लागतो़ शेतीमालाची विक्री झाल्यानंतर थेट हातामध्ये रोख पैसे मिळावेत, अशी शेतकºयांची भावना असते़ परंतु, परभणी बाजार समितीत शेत माल विक्री केल्यानंतर त्याचे पेमेंट आठ दिवसांनी होत असल्याने शेतकरी ई-नाम प्रणालीतून माल विक्री करण्याऐवजी खाजगी व्यापाºयांना किंवा ज्या बाजार समितीत ई-नाम प्र्रणाली नाही, तेथे शेतमाल विक्री करीत आहेत़ परभणी बाजार समितीच्या अंतर्गत असलेल्या अनेक कापूस उत्पादकांनी मानवत येथील बाजार समितीत कापसाची विक्री केली़ त्याचाही फटका परभणी बाजार समितीला बसला आहे़
भाव कमी मिळत असल्याचा परिणाम
दुष्काळी परिस्थितीबरोबरच परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांनी या बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे़ मानवतसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कापसाला किमान १०० रुपये जास्तीचा भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांनी ज्या ठिकाणी अधिक भाव आहे तेथे कापूस विक्री करणे पसंत केले़ परिणामी बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली आहे़