पाण्याअभावी झाडे वाळू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:31 AM2021-03-04T04:31:14+5:302021-03-04T04:31:14+5:30
कार्यालयात वाढली अस्वच्छता परभणी : जिल्हाभरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता वाढली आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात ही ...
कार्यालयात वाढली अस्वच्छता
परभणी : जिल्हाभरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता वाढली आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात ही परिस्थिती दिसून येते. या भागात अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. मात्र, इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. फरशा उखडल्या असून, भिंतींचे कोपरे पान खाऊन थुंकल्याने रंगले आहेत.
बाजारपेठ भागातील रस्त्यावर खड्डे
परभणी : शहरातील मोंढा बाजारपेठ भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. मागच्या काही दिवसांपासून या भागात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाजार समिती प्रशासनाने या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
प्लास्टिक संकलन मोहीम
परभणी : जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात प्लास्टिकमुक्त गाव चळवळ राबविली जात आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच प्लास्टिकमुक्त गावाचे जनजागरण केले जात असून, ठिकठिकाण प्लास्टिक कचरा संकलित केला जात आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो.
अस्वच्छता वाढली
परभणी : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. नालीचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत. त्यामुळे घाण पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
जड वाहनांचा शिरकाव
परभणी : शहरात सर्रास जड वाहनांचा शिरकाव होत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. नियम डावलत ही वाहने शहरातून धावतात. त्यामुळे वाहतूक खोळंबा होत आहे. बाजारपेठ भागात ही समस्या अधिक आहे.
वाहतुकीचा खोळंबा
परभणी : येथील विसावा कॉर्नर भागात चारही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या ठिकाणाहून जाणाऱ्या स्टेशन रोडवरील वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक सुरू केल्यास ही समस्या निकाली निघू शकते.
मास्कची विक्री वाढली
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मास्कचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तीन दिवसांपासून कारवाया सुरू केल्याने शहरी भागात मास्कची विक्री वाढली आहे. बाजारपेठ भागातील रस्त्याकडेला अनेक ठिकाणी मास्क विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत.
उसाचे क्षेत्र वाढले
परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. पूर्णा, गंगाखेड, पालम, पाथरी या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. गोदावरी पात्रातील बंधारे, जायकवाडी, दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाकडे कल वाढविला आहे.