डिझेल नसल्याने परभणीत घंटागाड्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:20 AM2018-05-01T00:20:44+5:302018-05-01T00:20:44+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक अ मधील घंटागाड्यांना डिझेल नसल्याने जवळपास २२ घंटागाड्या सोमवारी बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक अ मधील घंटागाड्यांना डिझेल नसल्याने जवळपास २२ घंटागाड्या सोमवारी बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे.
परभणी शहरातील कचरा उचलण्यासाठी प्रभाग समिती अ, ब व क अंतर्गत घंटागाड्या मनपाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. तिन्ही समित्यांतर्गत कार्यरत असलेल्या या घंटागाड्यांना डिझेल मात्र वेगवेगळ्या पेट्रोलपंपावरुन दिले जाते. प्रभाग समिती अ अंतर्गत कार्यरत असलेल्या २२ घंटागाड्यांना जिंतूररोडवरील पेट्रोलपंपावरुन डिझेल दिले जाते. सोमवारी या २२ घंटागाड्यांना डिझेलच मिळाले नाही. त्यामुळे या घंटागाड्या दिवसभर जागेवर थांबल्या होत्या. या संदर्भात मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पेट्रोलपंपावरील एका कर्मचाºयाच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने सकाळी पेट्रोलपंप बंद होता. त्यामुळे डिझेल मिळाले नाही, असे सांगण्यात आले. वसमत रस्त्यावरील पेट्रोलपंपावरुन पेट्रोल टाकणे परवडणारे नाही, कारण एका घंटागाडीला दोन लिटर डिझेल दिले जाते.
वसमतरोडवरुन डिझेल घेतल्यास त्या पेट्रोलपंपावरुन डिझेल भरलेली घंटागाडी प्रभाग समिती अ मध्ये येईपर्यंत जवळपास १ लिटर डिझेल लागते. त्यामुळे आर्थिक फटका बसतो. म्हणून वसमतरोडवरील पेट्रोलपंपावरुन डिझेल घेण्यात आले नाही, असेही मनपाच्या प्रभाग समिती अ मधील अधिकाºयांनी सांगितले.
दुसरीकडे काही पदाधिकाºयांनी मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे मनपाकडे डिझेल भरण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. सोमवारी पैशांची तजबीज झाली नाही. त्यामुळे या घंटागाड्या जागेवरच होत्या, असे सांगण्यात आले. त्यामुळे खरी परिस्थिती काय आहे, हे मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनाच माहीत आहे.