दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये पास होण्यासाठी तोतयागिरी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 11:45 AM2022-03-21T11:45:56+5:302022-03-21T11:47:38+5:30
दहावीच्या परीक्षेत आढळला तोतया परीक्षार्थी, पूर्णा तालुक्यातील प्रकार
परभणी : मूळ परीक्षार्थ्याच्या नावावर दुसराच परीक्षार्थी परीक्षा देत असल्याचा प्रकार १९ मार्च रोजी पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील परीक्षा केंद्रावर आढळला असून, चुडावा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. १९ मार्च रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता. पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एका खोलीमध्ये के. १४८०३५ या आसन क्रमांकावर परीक्षा देणारा परीक्षार्थी हा मूळ परीक्षार्थी नसल्याची बाब केंद्र संचालक शेख रफिक शेख इस्माईल यांच्या निदर्शनास आली. सकाळी ११.१५ च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर शेख रफिक शेख इस्माईल यांनी या परीक्षार्थ्यास उभे केले तेव्हा संधी साधून तो त्या ठिकाणाहून पळून गेला. याप्रकरणी केंद्र संचालक शेख रफिक शेख इस्माईल यांनी १९ मार्च रोजी रात्री उशिरा चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दहावी बोर्डाच्या इंग्रजी विषयाची परीक्षा सुरू असताना के १४८०३५ या आसन क्रमांकावर मूळ परीक्षार्थ्याऐवजी नांदेड जिल्ह्यातील धर्मापुरी येथील आरोपी कृष्णा मारुती पांढरे हा तोतयागिरी करून आपणच मूळ परीक्षार्थी असल्याचे भासवून परीक्षा देत होता. मूळ परीक्षार्थ्यानेही स्वत:च्या फायद्यासाठी फसवणूक केली, अशी तक्रार दिली आहे. त्यावरून चुडावा पोलीस ठाण्यात मूळ परीक्षार्थ्यासह कृष्णा मारुती पांढरे या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडित, गुट्टे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.