मुंडे - धस वादात दुर्राणी यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:44 PM2018-05-05T12:44:36+5:302018-05-05T12:44:36+5:30

राजकीय विश्लेषण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी मंत्री सुरेश धस यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाचा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या जागेवर परिणाम झाला असून, त्यातूनच राष्ट्रवादीचे मावळते आ़ बाबाजानी दुर्राणी यांचा राजकीय बळी गेल्याची चर्चा जिल्हाभरात होताना दिसून येत आहे़ 

Durrani victim of Munde - Dhas battle | मुंडे - धस वादात दुर्राणी यांचा बळी

मुंडे - धस वादात दुर्राणी यांचा बळी

Next
ठळक मुद्देपरभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे नेतृत्व सध्या राष्ट्रवादीचे आ़ बाबाजानी दुर्राणी हे करीत आहेत. बीड जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी मंत्री सुरेश धस यांच्यात झालेल्या टोकाच्या वाद आहे

- अभिमन्यू कांबळे 

परभणी : बीड जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी मंत्री सुरेश धस यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाचा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या जागेवर परिणाम झाला असून, त्यातूनच राष्ट्रवादीचे मावळते आ़ बाबाजानी दुर्राणी यांचा राजकीय बळी गेल्याची चर्चा जिल्हाभरात होताना दिसून येत आहे़ 

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे नेतृत्व सध्या राष्ट्रवादीचे आ़ बाबाजानी दुर्राणी हे करीत आहेत. या मतदार संघात संख्या बळाचा विचार केला असता काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी वरचढ असल्याचे दिसून येते़. परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे १६२ तर काँग्रेसकडे १३५ सदस्यांचे संख्याबळ आहे़. त्यातही जिंतूरचे माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची सदस्य संख्या घटली आहे़. उघड उघड भाजपाचे काम केल्यास पक्षांतर बंदी कायद्यानुसार ते अपात्र ठरू शकतात. त्यामुळे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले जवळपास २७ सदस्य भाजपाशी सलगी करून आहेत. ही राजकीय परिस्थिती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना गेल्या वर्षभरापासून ज्ञात आहे़. त्यामुळे २१ जून रोजी कार्यकाळ संपणारी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहील, अशी राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या काही नेत्यांची धारणा होती़. त्यानुसार या निवडणुकीची गेल्या दीड महिन्यापासून राष्ट्रवादीकडून तयारी सुरू होती़. 

मावळते आ़ दुर्राणी यांनी आघाडीच्या सदस्यांशी चर्चेची एक फेरीही पूर्ण केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही दुर्राणी यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले होते़. २९ एप्रिल रोजी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या कार्यक्रमात परभणीची जिंकलेली जागा राष्ट्रवादीकडेच राहील, असे संकेत अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते़. विशेष म्हणजे १ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने आ़ दुर्राणी यांना पक्षाचा एबी फॉर्मही दिला. त्यामुळे दुर्राणी हे निश्चित होते़. त्यांनी ३ मे रोजी सकाळी ११ वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते़. 

दुसरीकडे काँग्रेसचे माजी आ़ सुरेश देशमुख यांनी परभणी-हिंगोलीची जागा सहा वर्षांपूर्वी काँग्रेसकडे होती़ ती परत मिळावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली़. यासाठी त्यांची चार ते पाच वेळा दिल्ली वारी झाली़. त्यानंतर ते परभणीची जागा काँग्रेसकडेच येणार असे सांगत होते़. या सर्व घडामोडी होत असताना शेजारच्या बीड जिल्ह्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी मंत्री सुरेश धस यांच्यातील सुरु झालेला वाद जि़प़ अध्यक्ष निवडणुकीपासूनचा विकोपाला गेला. 

उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाकडून धस यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळताच लातूरचे भाजपाचे नेते रमेश कराड यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेशाची तयारी सुरू केली. त्यासाठी आ़ धनंजय मुंडे यांनी त्यांना मदतच केली नव्हे तर उस्मानाबाद-लातूर-बीड मतदार संघाची जागा काँग्रेसकडून त्यांच्यासाठी सोडून घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचीही तयारी चालविली़. जि़प़ अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील बदला घेण्यासाठी त्यांनी आघाडीचे जागा वाटप पूर्ण होण्याअगोदरच १ मे रोजी कराड यांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्मही मिळवून दिला. त्यामुळे आघाडीतील जागा वाटपानुसार परभणीची राष्ट्रवादीची जागा काँग्रेसकडे जाणार हे निश्चित झाले होते़; परंतु, या संदर्भातील कुणकुण राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना बिलकूल नव्हती़. 

३ मे रोजी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आ़ दुर्राणी यांनी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी भवन येथे जमण्याचे आवाहन केले़. त्यानुसार मोठ्या प्रमाणात दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते सकाळी १० वाजेपासूनच  परभणीतील राष्ट्रवादी भवन येथे जमले़. येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने येथे त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती़. जेवणाची तयारी सुरू असतानाच सकाळी १० वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आ़ दुर्राणी यांना फोन आला व आघाडीतील जागा वाटपानुसार परभणीची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे़, तुम्ही उमेदवारी दाखल करू नका, असा निरोप देण्यात आला़. त्याला आ़ दुर्राणी यांनी होकार देत पक्षादेश मान्य असल्याचे सांगितले़.

ही माहिती कार्यकर्त्यांना समजल्यानंतर बराच गदारोळ झाला; परंतु, आ़ दुर्राणी यांनी पक्षादेश मान्य करून कार्यकर्त्यांची समजूत काढली व आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले़. त्यानंतर देशमुख यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला. एक दिवस अगोदरपर्यंत स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करणाऱ्या दुर्राणी यांच्यावर मित्र पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याची वेळ आली़. या सर्व घडामोडी बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे-सुरेश धस यांच्या वादामुळे घडल्या. त्यात आ़ दुर्राणी यांचा राजकीय बळी गेल्याची चर्चा परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात होताना दिसून येत आहे़.

Web Title: Durrani victim of Munde - Dhas battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.