ई-पीक पाहणी पोहोचली ९६ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:38+5:302021-01-03T04:18:38+5:30
देवगाव फाटा : शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप व रब्बी पिकांची नोंद मोबाइलद्वारे ऑनलाइन ई-पीक ॲपमध्ये करण्यासाठी प्रयोगिक तत्त्वावर राज्य शासनाने ...
देवगाव फाटा : शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप व रब्बी पिकांची नोंद मोबाइलद्वारे ऑनलाइन ई-पीक ॲपमध्ये करण्यासाठी प्रयोगिक तत्त्वावर राज्य शासनाने सेलू तालुक्याची निवड केली होती. या अंतर्गत ई-पीक पाहणीचे उद्दिष्ट ९६.२३ टक्क्यावर पोहोचले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ३१ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या कामाचे कौतुक केले.
राज्य शासन व टाटा टास्क यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील सात तालुक्यांची निवड केली होती. यामध्ये मराठवाड्यातील ३ तालुक्यात ई-पीक पाहणी मोहीम राबविली. यामध्ये सेलू तालुक्याची निवड झाली होती. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांढिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, टाटा टास्कचे जिल्हाप्रमुख आनंद कदम यांच्यासह महसूल मंडळातील तलाठी, कृषी सहायक, सरपंच, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मदतीने ८ हजार १७६ सर्व्हे नंबरपैकी ७ हजार ७७५ सर्व्हे नंबरमधील ४५ हजार हेक्टरमधील उभ्या पिकात जाऊन ई-पीक पाहणी करण्यात आली. त्यानंतर मोबाइल ॲपमध्ये या पिकांच्यासह माहितीसह पिकांचा फाेटो, सातबारावर अचूक पिकांची नोंद करून ९६.३२ टक्के काम या उपक्रमांतर्गत पूर्ण करण्यात आले. या कामाची दखल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली. ३१ डिसेंबर रोजी एका पत्रान्वये उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार बालाजी शेवाळे तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांचे कौतुक केले.