ई- पास नावालाच; जिल्हा सीमा ओलांडून वाहनांचा बिनधास्त प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:24+5:302021-04-26T04:15:24+5:30
परभणी : राज्य शासनाच्या आदेशानुसार २२ एप्रिलपासून जिल्हा सीमा बंद केल्या असतानाही जिल्ह्याच्या हद्दीवरून ई-पासशिवाय वाहनांना सर्रास प्रवेश दिला ...
परभणी : राज्य शासनाच्या आदेशानुसार २२ एप्रिलपासून जिल्हा सीमा बंद केल्या असतानाही जिल्ह्याच्या हद्दीवरून ई-पासशिवाय वाहनांना सर्रास प्रवेश दिला जात असल्याची बाब रविवारी केलेल्या पाहणीत समोर आली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ई-पासशिवाय एकाही वाहनाला जिल्ह्यात प्रवेश दिला जाऊ नये, असे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु, जिल्हा सीमांवर मात्र या आदेशाचे फारसे गांभीर्याने पालन होत नसल्याचे रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ठिकठिकाणी केलेल्या पाहणीत दिसून आले. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारी सीमा जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे आहे. या ठिकाणच्या चेकपोस्टची पाहणी केली तेव्हा एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे परजिल्ह्यातील वाहने बिनधास्तपणे जिल्ह्यात प्रवेशित झाले. सेलू तालुक्यातील देवगाव फाटा, साताेना या ठिकाणीही केवळ तपासण्या झाल्या; पास नसतानाही वाहनांना प्रवेश देण्यात आला. पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा चौकीवर मात्र काही वाहने पास नसल्याने परत पाठविण्यात आल्याचे दिसून आले. चुडावा चौकीवर मात्र जिल्हा प्रवेश होत असल्याची बाब निदर्शनास आली.
येलदरी चौकी
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील चौकीवर रविवारी पाहणी केली असता, वाहने बिनधास्तपणे जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याचे दिसून आले. तसेच चौकीत एकही कर्मचारी उपस्थित नसल्याची बाबही या पाहणीत आढळली. त्यामुळे शासनाच्या आदेशाचा बोजवारा उडाला आहे.
देवगाव फाटा
सेलू तालुक्यातील देवगाव फाटा चौकीवर पोलीस व आरोग्य कर्मचारी मिळून ९ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनांची तपासणी होते. तसेच रविवारी पाहणी केली तेव्हा काही वाहनधारकांची रॅपिड ॲंटिजेन टेस्ट करण्यात आल्याचे दिसून आले.
झिरो फाटा
परभणी : वसमत मार्गावरील झिरो फाटा येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. ई-पास नसतानाही काही वाहनधारकांना जिल्ह्यात प्रवेश दिल्याची बाब पाहणीमध्ये स्पष्ट झाली.
हद्दीवर कर्मचारी तैनात
जिल्ह्यात पूर्णा, सेलू, जिंतूर, पाथरी या तालुक्यांमध्ये जिल्ह्याच्या सीमा आहेत. या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाहनांची तपासणी केली जात आहे. ई-पास असेल त्या वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्याचे आदेश असताना या आदेशाचे मात्र उल्लंघन होत आहे. केवळ वाहनधारकांची जुजबी तपासणी करण्यात येत आहे.
पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे दोन दिवसांपासून कडक तपासणी केली जात असल्याने रविवारी या मार्गावरील वाहतूक कमी झाल्याचे दिसून आले.