परभणीत पर्यावरण संवर्धनासाठी रविवारी ई-कचरा संकलन अभियान
By राजन मगरुळकर | Updated: January 22, 2025 19:19 IST2025-01-22T19:19:01+5:302025-01-22T19:19:27+5:30
शहरात सुमारे १३ संकलन केंद्रे अभियानासाठी उभारण्यात आली आहेत.

परभणीत पर्यावरण संवर्धनासाठी रविवारी ई-कचरा संकलन अभियान
परभणी : शहरातील सर्वांत मोठे ई-कचरा जनजागृती, संकलन अभियान रविवारी, दि. २६ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित केले आहे. या अभियानाचा उद्देश पर्यावरण संवर्धन आणि जबाबदारीने ई-कचऱ्याचे व्यवस्थापन याबद्दल जनजागृती केली जाणार आहे.
पर्यावरण संरक्षण गतीविधी आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला. निवासी सोसायट्या, व्यावसायिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये आणि कॉपॅरिट कंपन्या या अभियानात ई-कचरा संकलन केंद्र म्हणून सहभागी होत आहेत. शहरात सुमारे १३ संकलन केंद्रे अभियानासाठी उभारण्यात आली आहेत. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या केंद्रांवर ई-कचरा जमा करावा.
नागरिकांना आवाहन
ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून पर्यावरण रक्षण करण्यासाठी आणि शाश्वत व स्वच्छ भविष्य घडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नात सामील व्हावे. ई-कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतील आणि शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करता येईल. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ई-यंत्रण अभियानात सहभागी व्हा आणि जबाबदारीने कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्या.
शाळा, विद्यार्थ्यांना देणार साहित्य...
संकलित ई-कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर होऊ शकेल असे लॅपटॉप, संगणक आणि टॅबलेट दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू शाळा, अथवा विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले जातील. बाकी सर्व ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोंदणीकृत केलेल्या रिसायकलिंग केंद्रांकडे सोपवला जाईल.
ही राहणार संकलन केंद्र
शारदा महाविद्यालय, सुयोग इंग्लिश स्कूल शांतीनगर, केएनपी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट विसावा चौक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यालय, रामकृष्णनगर, समर्थ कम्प्युटर्स, जुना पेडगाव रोड, संकल्प मल्टिसर्व्हिसेस विसावा कॉर्नर, न्यू प्रगती बुक स्टॉल स्टेडियम कॉम्प्लेक्स, आकांक्षा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सहकारनगर, सेवा भारती कार्यालय, अप्पा पुळजकर भवन शिवरामनगर, ॲक्मे इंग्लिश स्कूल विष्णुनगर, विनय रबर स्टॅम्प, स्वाती कलेक्शन्स, छत्रपती शिवाजी चौक, राजन इलेक्ट्रॉनिक्स, त्रिमूर्तीनगर.