अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थचक्र बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:24+5:302021-01-18T04:15:24+5:30
देशात २२ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. आता अनलॉक प्रक्रियेनंतर ...
देशात २२ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या. आता अनलॉक प्रक्रियेनंतर नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत; परंतु अन्य वर्ग सुरू नाहीत. अभियांत्रिकी महाविद्यालयांची तर अधिक दयनीय अवस्था आहे. जिल्ह्यात परभणी येथे श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. हे महाविद्यालयही कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले आहे. या महाविद्यालयात सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांचे विविध शाखांचे ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. आर्थिक चणचण असतानाही प्राचार्य व प्राध्यापक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य या माध्यमातून करीत असल्याचे दिसून येत आहे.
शिष्यवृत्ती थकली, शैक्षणिक शुल्कही प्रलंबित
अभियांत्रिकी महाविद्यालयांंत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येते. श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांची जवळपास २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती शासनाकडे थकली आहे. सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग होत असले तरी अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे त्यांचे शुल्क भरलेले नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या आर्थिक अडचणीत वाढ झालेली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश सहा महिन्यांनी लांबले. त्यामुळे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून येणारे शुल्कही विलंबाने मिळत आहेत. परिणामी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींचा पगार कसा करावा, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. गेल्या तीन महिन्यांपर्यंत संबंधितांना नियमित पगार देण्यात आला. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून आर्थिक चणचणीतून प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचा पगार थकला आहे.
शासनाकडून एकीकडे मेक इन इंडियाची उद्घोषणा केली जात आहे. तर, दुसरीकडे अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शासनाने या महाविद्यालयांकडे लक्ष देऊन त्यांची आर्थिक अडचणीतून सोडवणूक करणे आवश्यक आहे. संशोधनासाठी अधिक प्रमाणात निधी लागतो. त्यामुळे नॅक, एनबीए आदींचा विचार न करता संशोधनासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना निधी दिला पाहिजे.
- डॉ. आनंद पाथरीकर, प्राचार्य,
श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय