खाद्यतेलाचे भाव भिडले गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:56+5:302021-01-09T04:13:56+5:30
जिंतूर : अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने ...
जिंतूर : अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेतील सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने गरिबांच्या घरातील फोडणी बंद होण्याची वेळ आली आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक झाली नाही. त्याचा परिणाम आता खाद्यतेलावर दिसून येत आहे. देशात ७० टक्के खाद्यतेल विदेशातून आयात केले जात आहे. तर दुसरीकडे, ३० टक्के तेलच देशात तयार होत आहे. तसेच कोरोना संकटामुळे यावर्षी खाद्यतेलाची विदेशातून होणारी आयात ठप्प आहे तर दुसरीकडे केंद्र शासनाने आयात शुल्कही भरमसाठ वाढविले आहे. त्याचा परिणाम म्हणून १५ लिटरचा सोयाबीन तेलाचा डब्बा पूर्वी १५०० रुपयांपर्यंत मिळत होता. आता २ हजार रुपयांच्या घरात गेला आहे. सरकीच्या तेलाचा दरही ११५ रुपये प्रतिकिलोवर जावून पोहोचला आहे. सूर्यफूल १३५, पामतेल १२५ तर सोयाबीन १४० तर शेंगदाणा तेल १८० रुपये किलो जावून पोहोचले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेत खाद्यतेलाची होत असलेली भाववाढ सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक बोजा टाकणारी ठरत आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
तांदळाच्या भावातही वाढ
जिंतूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तांदळाला मागणी असते. जुन्या तांदळाची मागणी ग्रहाकांकडून वाढत असल्याने बाजारपेठेत तांदळाची झालेली भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. नवीन तांदूळ बाजारात आल्यानंतर भाव कमी होतील, अशी अपेक्षा असली तरी सद्यस्थितीत ४ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपयांवर प्रतिक्विंटल तांदळाचा भाव गेला आहे. त्यामुळे खाद्यतेलाबरोबरच तांदूळही महागल्याने संक्रांतीचा सण नागरिकांना महागाईच्या दिवसातच साजरा करावा लागणार आहे.
यावर्षीच्या वातावरणातील बदल तसेच इतर देशांमध्ये झालेले तेलबियांचे नुकसान त्यामुळे रिफाईंड तेलाची बाजारात टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे येत्या महिन्यात ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
गोपाळ चिद्रवार, होलसेल विक्रेते, जिंतूर