आठ महिन्यांनंतर शिक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:47 AM2020-12-04T04:47:10+5:302020-12-04T04:47:10+5:30
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या निर्णयानुसार २ डिसेंबरपासून मनपा हद्द वगळता ग्रामीण ...
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या निर्णयानुसार २ डिसेंबरपासून मनपा हद्द वगळता ग्रामीण भागातील दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे शाळेचा हा पहिला दिवस विद्यार्थी, शिक्षकांसाठी उत्साहवर्धक ठरला. फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझेशनचे नियम पाळत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर उभे राहून शिक्षकांनी शिकविण्यास प्रारंभ केला. कोरोनाच्या संकटानंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आपला वर्ग, आपला बेंच, बसण्याची जागा विद्यार्थ्यांनी नव्याने अनुभवली. यावेळी विद्यार्थ्यांचे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नसल्याने काही शाळांना भेटी दिल्यानंतर दिसून आले.
कोणत्या शाळेत काय अनुभव आले
शांताबाई नखाते विद्यालय, देवगाव फाटा
सकाळी ११.४० वाजता शाळेला भेट दिली, तेव्हा दहावीचा वर्ग सुरू होता. १४० पैकी ४२ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. एका वर्गात २१ या पद्धतीने दोन वर्गात फिजिकल डिस्टन्सनुसार विद्यार्थी बसलेले होते. एका वर्गात हुगे हे शिक्षक गणित विषय शिकवीत होते, तर दुसऱ्या वर्गात बालाजी पडोळे हे विज्ञान विषय शिकवीत होते. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दररोज चार तास शाळा भरविली जाणार असल्याचे मुख्याध्यापक प्रल्हाद शहारे यांनी सांगितले.
अन्नपूर्णा कनिष्ठ महाविद्यालयास दुपारी १२.४५ च्या सुमारास भेट दिली असता एका वर्गात १२ विद्यार्थी उपस्थित होते. बारावी विज्ञान शाखेत ५३ विद्यार्थी आहेत. पालकांनी संमती दिलेले १४ विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित झाले होते. थर्मल गनच्या साह्याने तपासणी करण्यात आली. दोन विद्यार्थ्यांना सर्दीची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांना परत पाठविले, असे प्राचार्य एन.एस. उबाळे यांनी सांगितले.
शकुंतला कत्रुवार विद्यालय, मानवत
या शाळेत सकाळी १० वाजेच्या सुमारास भेट दिली तेव्हा दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होते. दहावीच्या तीन तुकड्यांमध्ये १७६ विद्यार्थिसंख्या आहे. केवळ ६२ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. याच वेळी शिक्षणाधिकारी वंदना वाहूळ या देखील शाळेत पाहणीसाठी दाखल झाल्या होत्या. कोरोनाच्या अनुषंगाने त्यांनी शाळेने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.