पाण्यासाठी ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न, तहसिलदाराच्या दालनातच केले विषारी द्रव्य प्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:29 PM2018-04-19T12:29:01+5:302018-04-19T12:35:35+5:30
मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.
परभणी : मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी १०.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यातील दोघा ग्रामस्थांची प्रकृती अस्वस्थ असून, त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, मानवत तालुक्यातील मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता़ मानोली गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, २२ बोगस बंधाऱ्यांची चौकशी करावी आणि गावातील इतर गैरव्यवहारांची चौकशी करावी, अशा ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या होत्या़ या मागण्या न सोडविल्यास १९ एप्रिल रोजी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
आज सकाळी १०़३० वाजण्याच्या सुमारास हे ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाले़ पोलीस प्रशासनाने या ग्रामस्थांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली़ या झटपटीतच लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम, शेख सगीर या चार ग्रामस्थांनी सोबत आणलेले विष प्राशन केले़ त्यानंतर एकच गोंधळ उडाला़ तातडीने या चारही ग्रामस्थांना मानवतच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चारही ग्रामस्थांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे़