प्राथमिक आरोग्य केंद्रांना आठ लाखांचे साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:16+5:302021-06-25T04:14:16+5:30
‘ऑक्सफॉम इंडिया’चा उपक्रम : वैद्यकीय उपकरणांचा समावेश परभणी : ऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्राला ...
‘ऑक्सफॉम इंडिया’चा उपक्रम : वैद्यकीय उपकरणांचा समावेश
परभणी : ऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्राला आठ लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणे भेट म्हणून देण्यात आली. ऑक्सफॉम ही एक सामाजिक संस्था असून, ती मागील काही वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत आहे. ग्रामीण जनतेला आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने ही उपकरणे देण्यात आली आहेत. परभणी तालुक्यातील झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आठ ऑक्सिजन सिलिंडर, आठ ऑक्सिजन फ्लोमीटर, १५ नेब्युलायझर मशीन, ५ सेमीफ्लोर बेड, १०० पीपीई किट, एन ९५ मास्क, फेसशिल्ड, आदी साहित्य जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, ऑक्सफॉम इंडियाचे आनंद पेडगावकर यांची उपस्थिती होती.
ग्रामीण जनतेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांची जी धावपळ होती, ती थांबविण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला मदत मिळण्यासाठी ऑक्सफॉम इंडियातर्फे मिशन संजीवनीच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडर, मास्क, सॅनिटायझर, बेड हे सर्व वैद्यकीय साहित्य देत आहोत, असे संस्थेच्या वतीने सांगितले. कोरोनामध्ये गोरगरीब जनतेचा जो खर्च होतो, तो अवाढव्य असून ग्रामस्थांना मदत व्हावी, याच संकल्पनेच्या माध्यमातून हे साहित्य ‘ऑक्सफॉम इंडिया’कडून देण्यात येत आहे, असे आनंद पेडगावकर यांनी सांगितले.