आठ महिन्यांत जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे ८७ लाखांचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 06:33 PM2019-12-25T18:33:25+5:302019-12-25T18:36:35+5:30
अवैध दारू विक्री विरुद्ध कारवायांत १८ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त
परभणी : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठ महिन्यांत ८७ लाख २ हजार रुपयांचा महसूल मिळविला असून, अवैध दारू विक्री प्रकरणामध्ये ३७१ कारवाया केल्या असून, त्यात १८ लाख ७६ हजार ६४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अधीक्षक आऱ आऱ कोल्हे यांनी दिली़
परभणी जिल्ह्यातील दारू विक्रीचे परवाने देणे, अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केले जाते़ अवैध दारू निर्मिती, दारुची अवैध वाहतूक आणि विक्री यावर या विभागाच्या माध्यमातून कारवाया करून दंड वसूल केला जातो़ राज्य शासनाच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक विभागांना महसूलाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आलेले असते़ त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागालाही यावर्षी ४ कोटी ३२ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, त्या तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांमध्ये या विभागाने ८७ लाख २ हजार ८७४ रुपयांचा महसूल मिळविला आहे़
मागील वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत ६९ लाख ३७ हजार ९४५ रुपयांचा महसूल या विभागाने मिळविला होता़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ जिल्ह्यामध्ये दारू विक्रीसाठी दिलेल्या परवान्यांचे नूतनीकरण करणे, अवैध दारू विक्रीतून दंडात्मक रक्कम वसूल करणे या माध्यमातून या विभागाला महसूल प्राप्त होतो़ एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत चालू वर्षामध्ये एकूण ३७१ केसेस करण्यात आल्या असून, त्यात १८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ मागील वर्षी या विभागाने याच काळात १५१ केसेस केल्या होत्या़ त्यातून ९ लाख ४० हजार २०९ रुपयांचा मुद्देमाल प्राप्त झाला होता़
मागील वर्षीच्या तुलनेत कारवाया आणि मुद्देमाल जप्त करण्याचे प्रमाणही वाढले आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून अबकारी कराची वसुली केली जाते़ त्यामुळे ज्या भागात मद्य निर्मितीचे प्रकल्प आहेत़ त्या ठिकाणी महसूलाचे प्रमाण अधिक आहे़ परभणी जिल्ह्यात मद्य निर्मिती होत नसल्याने केवळ परवाने नूतनीकरण आणि दंडात्मक कारवायांमधून या विभागाल महसूल प्राप्त होतो़ असे असतानाही शासनाने निश्चित करून दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जातात़ यावर्षी ४ कोटी ३२ लाख रुपयांचे उद्दिष्ट राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाले असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत अवघे ८७ लाख २ हजार ८७४ रुपये वसूल झाले आहेत़ सर्वसाधारणपणे या विभागाचे उद्दिष्ट मार्च महिन्यातच पूर्ण होते़ या महिन्यात बहुतांश परवाना धारकांना त्यांचे परवाने नूतनीकरण करावे लागतात आणि या नूतनीकरणातून मिळणाऱ्या रकमेतून ८० टक्क्यांपर्यंत उद्दिष्टपूर्ती होत असल्याची माहिती मिळाली़ गतवर्षी या विभागाने ३ कोटी ८४ लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला होता़ यावर्षीही हे उद्दिष्ट गाठले जाईल, असे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वर्षभरात चार नवीन परवाने
राज्य उत्पादनक शुल्क विभागाच्या माध्यमातून एफएल-२ (वाईन शॉप परवाना), सीएल-२ (देशी दारू होलसेल परवाना), सीएल-३ (देशी दारू किरकोळ परवाना), एफएल-३ (परमीट रुम परवाना) आणि एफएलव्हीआर-२ (बिअरशॉपी परवाना) हे परवाने दिले जातात़ त्यापैकी एफएल-२, सीएल-२ या परवान्यांचे वितरण वरिष्ठ स्तरावरुन होते़ त्यामुळे चालू वर्षात एफएल-३ हे परमीट रुमचे ३ आणि एफएलव्हीआर-२ बिअरशॉपीचा १ असे ४ परवाने देण्यात आले आहेत़ परवान्यांचे नूतनीकरण करताना विभागाला अधिक महसूल प्राप्त होतो़ ४लोकसंख्येच्या आधारावर या परवान्यांचे शुल्क निश्चित केले जाते़ एफएल-२ या परवाना धारकास परभणी शहरांतर्गत परवाना असल्यास ५ लाख ७७ हजार रुपये आाणि परभणी वगळता इतर भागात परवाना असल्यास २ लाख २ हजार रुपये नूतनीकरण शुल्क आहे़ त्यामुळे नूतनीकरणाच्या माध्यमातून अधिक महसूल प्राप्त होतो़
दोन पथकांची स्थापना
३१ डिसेंबर रोजी अवैध दारू विक्री होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दारू विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी २ विशेष पथक स्थापन केले आहेत़ हे पथक जिल्ह्यातील ढाबे आणि घरगुती दारू विक्री रोखण्यासाठी गस्त घालणार आहेत़ अवैध दारू विक्री संदर्भात तक्रारी करण्यासाठी या विभागाने व्हॉटस्अॅप क्रमांक उपलब्ध करून दिला असून, नागरिकांना १८००८३३३३३३ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अधीक्षक आऱआऱ कोल्हे यांनी केले आहे़
थर्टी फर्स्टसाठी वाढीव वेळ
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा केला जातो़ या पार्श्वभूमीवर शासनाने तीन दिवस परवानाधारक दुकानदारांना वेळेची मर्यादा वाढवून दिली आहे़ त्यानुसार २४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी प्रत्येक परवानाधारकास ठराविक वेळ वाढवून दिला आहे. बिअरशॉपींना सर्वसाधारणपणे रात्री १०़३० वाजेपर्यंतची व्यवसायाची मुदत आहे़ या तीन दिवसांत ही मुदत रात्री १ वाजेपर्यंत वाढविली आहे़ देशी दारु किरकोळ विक्रेत्यांना सर्वसाधारणपणे रात्री १० वाजेपर्यंत दारू विक्री करता येते; परंतु, वरील तीन दिवसांत या विक्रेत्यांना रात्री १ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे़ तर परमीट रुम चालकांना रात्री ११ वाजेपर्यंत व्यवसाय करता येतो़ २४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी परमीट रुमला पहाटे ५ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे़