अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस आठ वर्षांची शिक्षा; परभणी जिल्हा न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 02:27 PM2017-12-27T14:27:14+5:302017-12-27T15:20:22+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस आठ वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपये दंड ठोठावण्याचा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला एस़ कलके यांनी दिला आहे.
परभणी: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस आठ वर्षांची शिक्षा आणि आठ हजार रुपये दंड ठोठावण्याचा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला एस़ कलके यांनी दिला आहे़
या प्रकरणाच्या संदर्भात अॅड़ इम्तीयाज खान यांनी माहिती दिली त्यानुसार, ४ मे २०१६ रोजी परभणी शहरातील महात्मा गांधी रोडवर अल्पवयीन मुलीला मारहाण करून बलात्कार केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगींक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता़
हे प्रकरण विशेष न्यायालयात चालविण्यात आले़ सरकार पक्षाच्या वतीने ५ साक्षीदार तपासण्यात आले़ साक्षी पुराव्याअंती आरोपीविरूद्ध दोष सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके यांनी आरोपी शेख असलम शेख नबी यास कलम ३७६ (१) भादंवि अन्वये दोषी ठरवून त्याला ७ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला़ तसेच कलम ३२३ भादंवि अंतर्गत तीन महिन्यांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, कलम ५०६ (१) भादंवि अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी ८ वर्षे ३ महिने सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़ या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता एऩव्ही़ कोकड यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली़ त्यांना अॅड़ इम्तीयाज खान यांनी सहकार्य केले़