Video: ४० फुट उंच कमानीवर चढून युवकाचा गोंधळ, नंतर घेतली उडी; पोलिसांची तारांबळ
By राजन मगरुळकर | Published: July 25, 2022 06:54 PM2022-07-25T18:54:42+5:302022-07-25T18:57:25+5:30
वसमत महामार्गावरील प्रकार : परभणीत पोलीस, अग्निशमन दलाच्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे बचावला
परभणी :
परभणीच्या वसमत मार्गावरील एका स्वागत कमानीवर एक युवकानं चढून गदारोळ घातल्याची घटना घडली. युवक चक्क ३० ते ४० फूट उंच कमानीवर चढून गोंधळ घालत होता. युवकाच्या गोंधळाने पोलीस यंत्रणेची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. हा सर्व प्रकार वसमत राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी परिसरात सोमवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान घडला आहे.
शहरात दाखल होणाऱ्या रस्त्यावर वसमत महामार्ग कमानीवर चढून एका युवकाने अर्धा तास गोंधळ घातला. युवकाच्या या गोंधळामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. अखेर अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युवकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकाने ३० ते ४० फूट उंच कमानीवरून उडी मारली. कोणतेही कारण नसताना आणि काही मागणी सुद्धा नसताना युवकाने केलेल्या या प्रकारामुळे पोलीस, अग्निशमन तसेच उपस्थितही गोंधळात पडले होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदिपान शेळके, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे यांच्यासह २० ते २५ पोलीस आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
वसमत महामार्ग झाला जाम
शहरातील खानापूर फाटा, शासकीय विश्रामगृह, एमआयडीसी या परिसरात असलेल्या बांधकाम विभागाच्या महामार्गावरील कमानीवर हा युवक सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास वर चढला होता. त्याने अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ घातला. या गोंधळात महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल
या युवकाच्या गोंधळाचे व्हिडिओ काढून समाज माध्यमावर व्हायरल केले जात होते. त्यामुळे ही चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची गर्दी महामार्गावर झाली. परिणामी, पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन राखत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
ओळख न पटल्याने नेले ठाण्यात
घटनेतील युवकाची ओळख न पटल्याने संबंधितास घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात नेले. संबंधितास नवा मोंढा ठाण्यात दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी दिली. युवकाची ओळख पटल्यानंतर त्याचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि युवक मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. युवक भोळसर असून तो सेलू तालुक्यातील रहिवासी आहे.