ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक म्हणजे 'काळी निवडणूक' : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 05:49 PM2021-12-27T17:49:34+5:302021-12-27T17:52:37+5:30

OBC Reservation : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारले आहे.

Elections without OBC reservation are 'black elections': Pankaja Munde | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक म्हणजे 'काळी निवडणूक' : पंकजा मुंडे

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक म्हणजे 'काळी निवडणूक' : पंकजा मुंडे

Next

जिंतूर ( परभणी ) : ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) मिळावे यासाठी आता मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन काय उपयोग. आटापिटा करणारे राज्य सरकार इतक्या दिवस झोपा काढत होते का ? असा सवाल भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी केला. तसेच जर महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या तर त्या इतिहासातील काळ्या निवडणूका ठरतील, असा इशाराही मुंडे यांनी आज येथे दिला. 

तालुक्यातील धमधम येथे श्री संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व मंदिराच्या कलशारोहन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार तोताराम कायंदे, हभप सुदाम महाराज, प्रवीण घुगे, लक्ष्मण बुधवंत, बबन महाराज हंडीकर, भगवान वटाणे, बाळासाहेब घुगे, खंडेराव आघाव, केशव घुले, योगेश घुगे, सुरेश भुमरे, प्रमोद कराड आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारले आहे. आता हेच राज्यकर्ते आरक्षण मिळावे यासाठी मंत्रिमंडळात ठराव घेत आहेत. वेळ निघून गेल्यानंतर ठरावाचा काय उपयोग ? असा सवाल त्यांनी केला. तसेच राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय आगामी निवडणुका झाल्या तर त्या इतिहासातील काळ्या निवडणुका ठरतील, त्यास राज्यकर्ते जबाबदार राहतील. त्यांना ओबीसी समाज कधीच माफ करणार नाही, असा इशारा देखील मुंडे यांनी यावेळी दिला. 

ओबीसींसाठी मोठा लढा उभारू 
सत्तेत असणारे मराठा नेते समाजाला आरक्षण मिळावे म्हणून यापूर्वी कधीही पुढे आले नाहीत.  कारण त्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था, साखर कारखाने व मोठे उद्योगधंदे चालवायचे होते. सामान्य मराठा समाजाच्या तरुणाकडे लक्ष देण्यास मराठा समाजातील नेत्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळेच आज मराठा समाजही आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आपली भूमिका आहे. गोपीनाथ मुंडे यांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. भविष्यात ओबीसीसाठी मोठा लढा उभारू, अशी घोषणा देखील मुंडे यांनी यावेळी केली.

Web Title: Elections without OBC reservation are 'black elections': Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.