परभणी जिल्ह्यात १३२ केव्ही केंद्रांअभावी वाढली विजेची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:01 AM2018-11-27T00:01:58+5:302018-11-27T00:02:50+5:30
जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेवरील भार दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्ह्यात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ सद्यस्थितीला उपलब्ध असलेले ६ वीज केंद्र अपुरे पडत असून, त्यामुळे ग्रामीण भागात उपकेंद्रांना वीज पुरवठा करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी तीन १३२ केव्ही वीज केंद्रांची आवश्यकता निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेवरील भार दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्ह्यात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ सद्यस्थितीला उपलब्ध असलेले ६ वीज केंद्र अपुरे पडत असून, त्यामुळे ग्रामीण भागात उपकेंद्रांना वीज पुरवठा करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी तीन १३२ केव्ही वीज केंद्रांची आवश्यकता निर्माण झाली आहे़
परभणी जिल्ह्याला औष्णिक विद्युत केंद्रातून वीज पुरवठा होतो़ उपलब्ध झालेली वीज उपकेंद्रांच्या क्षमतेप्रमाणे वाहिन्यांद्वारे वितरित करण्याचे महत्त्वाचे काम १३२ केव्ही केंद्रांमधून केल जाते़ परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीला असे सहा केंद्र उपलब्ध आहेत़ परभणी, जिंतूर, सोनपेठ, पूर्णा, पाथरी आणि गंगाखेड येथून या केंद्रांच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था राबविली जाते़; परंतु, मागील काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ सद्यस्थितीला कृषी, घरगुती, औद्यागिक आणि वाणिज्य अशा चार गटांमध्ये २ लाख ८० हजार वीज ग्राहक विजेचा वापर करतात़ या ग्राहकांना वीज पुरवठा करताना महावितरणला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे़ केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येकाच्या घरी वीज जोडणी देण्याच्या योजना आखल्या जात आहेत़ सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज ग्राहकांसाठी महावितरणने वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे़ एकीकडे खेडोपाडी वीज पुरविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे साधन सामग्री वाढविण्यासाठी मात्र प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत़
परभणी जिल्ह्यामध्ये सहा १३२ केव्ही केंद्र आणि ३३ केव्हीची ७८ उपकेंद्रे आहेत़ या केंद्रांमधून ग्राहकांपर्यंत वीज पोहचविली जाते़ परंतु, जिल्ह्यातील विजेची मागणी लक्षात घेता १३२ केव्ही वीज केंद्रांची संख्या अपुरी पडत असून, या केंद्रांमधून वीज वितरण करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ विजेचा दाब कमी-अधिक होतो़ परिणामी वीजपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत जाते़ ग्राहकांना सुरळीत वीज मिळत नसल्याने ओरड वाढत चालली आहे़ मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात विजेच्या संदर्भाने ग्राहकांच्या तक्रारी असतानाही प्रशासनाकडून मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत़ परिणामी जिल्ह्यामध्ये ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे़
मागणी वाढल्याने यंत्रणेवर ताण
मागील काही वर्षांच्या तुलनेत विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ वीज ग्राहकांची संख्या तर वाढली आहेच़ या शिवाय ग्राहकांकडून विजेचा वापरही दुपटीने वाढला आहे़ अनेक कामे विजेशिवाय होत नसल्याने दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत चालली आहे़ ग्राहकांची ही मागणी पुरविणारी यंत्रणा मात्र जुनीच आहे़ या यंत्रणेत सुविधा करणे आवश्यक असताना वेळोवेळी ही सुधारणा झाली नाही़ मागणीच्या तुलनेत यंत्रणा वाढविणे आवश्यक होते़ परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वीज वितरणावर ताण येत आहे़