महावितरणच्या १३३ कार्यालयांनाच विजेचे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:16 AM2021-01-21T04:16:56+5:302021-01-21T04:16:56+5:30
परभणी : येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र, यासाठी ...
परभणी : येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. मात्र, यासाठी कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील ९८६ कर्मचारी, अधिकारी वास्तव्यास असलेल्या सर्कल ऑफीस ते उपकेंद्र असे एकूण १३३ कार्यालयांचे इलेक्ट्रीक ऑडिट केले जात नाही.
परभणी जिल्ह्यातील घरगुती, कृषी, वाणिज्य व लघु दाब, औद्योगिक असे एकूण अडीच लाख वीज ग्राहकांना सर्कल ऑफीस, परभणी विभाग १, परभणी विभाग २, उपविभाग, शाखा कार्यालय व उपकेंद्र अशा एकूण १३३ कार्यालयांतर्गत वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी काम पाहिले जाते. यासाठी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, लाईनमन व ऑपरेटर अशी एकूण ९८६ पदे मंजूर आहेत. त्यातील ५७९ पदे भरण्यात आलेली आहेत. आजही ४०७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी काम पाहात असलेल्या उपविभाग कार्यालय, शाखा कार्यालय व उपकेंद्रांची दुरवस्था झालेली आहे. त्यातच महावितरणकडून त्याचे इलेक्ट्रीक ऑडिटही केले जात नाही. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
शाखा कार्यालय गैरसोयीचे
पूर्णा व परिसरातील वीज ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी निवारण्यासाठी शहरात असलेले शाखा कार्यालय आता उपविभागीय कार्यालयात ३ किमी अंतरावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे शाखा कार्यालय ग्राहकांच्या गैरसोयीचे ठरत आहे.
गंगाखेड येथील कार्यालयाची दुरवस्था
गंगाखेड शहर व परिसरातील वीज ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी व येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शहरालगत सहायक अभियंता कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या कार्यालयाची दुरवस्था झाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
उपकार्यकारी अभियंता कार्यलयाची दुरवस्था
सेलू शहर व परिसरातील वीज ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शहरात उपकार्यकारी अभियंता कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यालयाची दुरवस्था झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.