अकरा तलावांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:34+5:302021-03-21T04:16:34+5:30
परभणी : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेल्या अकरा तलावांमध्ये सध्या २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसााठा असून, या गावांसाठी आता ...
परभणी : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेल्या अकरा तलावांमध्ये सध्या २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसााठा असून, या गावांसाठी आता पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात एकूण २२ लघू प्रकल्प असून, या प्रकल्पावर गाव परिसरातील सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची भिस्त असते. स्थानिक पातळीवर गाव तलावातून पाणीपुरवठा होतो. अनेक योजनाही या तलावावर चालविल्या जातात. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मोठ्या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध असला तरी गाव तलावांनी मात्र तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. परभणी तालुक्यातील पेडगाव येथील तलावात सध्या १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे सोनपेठ तालुक्यातील नखातवाडी, गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी, जिंतूर तालुक्यातील जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, कवड आणि दहेगाव या तलावांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आणखी एक-दीड महिना या गावांना पाणी उपलब्ध होणार असले तरी पुढील मे महिन्यात मात्र या गावांत पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे आतापासूनच या गावांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लघू तलावांत ३६ टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील २२ लघू तलावांमध्ये ४२.२०५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. मात्र, त्या तुलनेत सद्य:स्थितीला केवळ १५.२६ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ३६ टक्के एवढी आहे. लघू तलावांतील निम्म्याहून अधिक पाणीसाठा कमी झाला आहे. त्याचप्रमाणे भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे.
नखातवाडीचा तलाव कोरडा
सोनपेठ तालुक्यातील नखातवाडीचा एकमेव तलाव कोरडा पडला असून, या तलावातील पाणीसाठा सध्या ज्योत्याखाली आहे. त्याचप्रमाणे भोसी येथील तलावात केवळ ३ टक्के, तर केहाळच्या तलावात ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चिंचोली येथील तलावात १५ टक्के, तर आडगाव तलावात १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पाणीसाठ्याची टक्केवारी
टक्केवारी तलाव संख्या
ज्योत्याखाली : १
० ते २५ टक्के : १०
२६ ते ५० टक्के : ५
५१ ते ७५ टक्के : ७
७६ ते १०० टक्के : १