वेतनासाठी परभणी मनपातील कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:30 PM2018-04-10T16:30:15+5:302018-04-10T16:30:15+5:30
तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत.
परभणी : तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत.
१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. विशेष म्हणजे वेतनाच्या मागणीसाठी ३ एप्रिल रोजी संघटनेचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासनही दिले. परंतु, अद्यापपर्यंत मागण्यांची पुर्तता झाली नाही. सणासुदीच्या काळात वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याही प्रलंबित असल्याने स्वच्छता विभागातील कायम व रोजंदारी कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. येथील महापालिकेच्या कार्यालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून वेतनाची मागणी केली.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कामगारांनी बोलून दाखविला. कायम व रोजंदारी सफाई कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन अदा करावे, सफाई कामगारांना १२ व २४ वर्षांच्या पदोन्नतीसाठी जात पडताळणीची अट रद्द करावी, रोजंदारी कामगारांना विना अट सेवेत कायम करावे, सफाई कामगारांना आकृतीबंधानुसार सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक पात्रतेनुसार मुकादम, शिपाई, वाहन चालक, लिपीक पदावर पदोन्नती द्यावी, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी द्यावी, कामगारांना घरे बांधून द्यावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. परभणी शहर महानगरपालिका सफाई कामगार संघटनेचे अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के.के. भारसाखळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.