मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण, अपहाराचे प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:22 AM2021-09-17T04:22:48+5:302021-09-17T04:22:48+5:30
परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी विविध प्रश्न घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यात ...
परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांनी विविध प्रश्न घेऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यात अपहार, अतिक्रमण या प्रश्नांसह वैयक्तिक प्रश्नांचाही समावेश आहे.
न्याय देण्याची मागणी
शिक्षित मुलांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करणे बंद करावे, या मागणीसाठी गव्हा येथील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पारधी समाजाचे हे ग्रामस्थ आहेत. आमच्या समाजात गुन्हेगारी राहिली नाही. मात्र, तरीही आम्हांला विनाकारण त्रास दिला जात आहे. तेव्हा गुन्हा केलेला नसताना त्रास दिला जाऊ नये. विनाकारण त्रास देणे, धमक्या देणे थांबवावे आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. गव्हा येथील हरणाबाई पवार, गयाबाई काळे, विठाबाई पवार, समाबाई काळे, मंगल पवार, शांताबाई काळे, गंगूबाई काळे आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.
अपहाराच्या चौकशीची मागणी
तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील उपसरपंच अर्जुन सामाले यांनीही अपहाराच्या चौकशीसाठी उपोषण सुरू केले आहे, ग्रामपंचायतीच्या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असून, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
सातवा वेतन आयोग लागू करा
राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विलीन करून सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच प्रत्येक महिन्याला वेतन अदा करावे, कर्मचाऱ्यांना काम नसल्यास हजेरी द्यावी, थकीत महागाई भत्ता एकरकमी द्यावा आदी मागण्यांसाठी उद्धव वाकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
जमिनीच्या हक्कासाठी उपोषण
वडिलोपार्जित जमिनीपैकी नावावर असलेली ४ एकर जमीन परस्पर इतरांच्या नावे केली असून, ती परत करावी, या मागणीसाठी पालम तालुक्यातील खडी येथील व्यंकटेश आकनगिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. व्यंकटेश आकनगिरे हे कायदेशीर वारस असतानाही त्यांना जमीन व घराचा हिस्सा मिळवून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
कारवाईच्या मागणीसाठी उपोषण
परभणी तालुक्यातील दैठणा येथील अनंत कच्छवे यांनीही १६ सप्टेंबरवपासून उपोषण सुरू केले आहे. ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत लिपीक यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. दैठणा येथील बोगस कामांची चौकशी करावी, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई करावी, अशीही त्यांची मागणी आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी अशोक अंबोरे व इतरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शासनाची दिशाभूल करून गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करीत हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.