अतिक्रमणाने मुख्य रस्त्याचा श्वास गुदमरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:48+5:302020-12-07T04:11:48+5:30
चार वर्षांपूर्वी रायगड काॅर्नर ते रेल्वेस्टेशन या मुख्य रस्त्याचे विस्तारिकरण करून डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे शहराच्या वैभवात ...
चार वर्षांपूर्वी रायगड काॅर्नर ते रेल्वेस्टेशन या मुख्य रस्त्याचे विस्तारिकरण करून डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली होती. परंतु, कालांतराने रस्त्यालगत पानटपऱ्या, खाद्य पदार्थाचे स्टाॅल, चहाचे दुकान तसेच विविध प्रकारचे साहित्य विक्रीचे दुकाने थाटण्यात आली. विशेष म्हणजे, रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकाजवळ तर अतिक्रमणधारकांनी रस्त्याचा मोठा भाग व्यापला आहे. तसेच फळविक्रेत्यांचे हातगाडेही रस्त्यावर लावली जात असल्याने वाहतुकीस निम्मा रस्ताच शिल्लक राहिला आहे. अनेकांनी घर आणि दुकानांसमोर रस्त्याच्या जागेत पोटभाडेकरू ठेवले आहे. दुकान आणि हातगाडा लावण्यासाठी प्रतिदिन वसुली केली जात आहे. शासनाच्या जागेच्या वसुलीचा नवा फंडा सेलूत सुरू आहे. अतिक्रमणामुळे हातगाडे आणि ऑटोरिक्षा लावण्यावरून तसेच जागा वापरण्यावरून नेहमीच वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. टुमदार रचना असलेल्या शहराचा चेहरा असलेला रायगड काॅर्नर ते रेल्वेस्टेशन हा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.
रायगड काॅर्नरचा अतिक्रमणचा वेढा
रायगड काॅर्नर परिसरात मुख्य रस्त्याच्या कडेला कच्चे आणि पक्क्या स्वरूपात झापटयाने अतिक्रमण वाढले आहेत. महावितरण कार्यालयाच्या समोरची जागा अतिक्रमण धारकांनी संपुर्ण व्यापली आहे. रातोरात मोकळया जागेवर व्यवसाय थाटले जात आहेत. रायगड काॅर्नर येथे चार रस्ते एकत्र येतात त्यामुळे या ठिकाणी वाहनाची वर्दळ असते.मात्र रस्ताच्या लगत दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत असल्याने वाहतुकीची कोंडी होणार आहे. हा रस्ता पुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत होता. तीन वर्षांपूर्वी या रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना सा.बां. ने अतिक्रमण हाटवण्याची नोटीस बजावली होती. पुढे मात्र अतिक्रमण हटाव मोहीम थंड बस्तानात गेली. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग अतिक्रमण संबंधित काय भुमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.