वाहनतळांच्या जागांवर अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:26+5:302021-03-15T04:16:26+5:30
ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई परभणी : जिल्ह्यात ग्रामीण मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सद्यस्थितीला ग्रामस्थांना पाणीटंचाईचा ...
ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
परभणी : जिल्ह्यात ग्रामीण मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सद्यस्थितीला ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही भागात वीजपुरवठा अभावी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर काही भागात जलवाहिनी फुटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. त्यामुळे पाणी असतानाही ग्रामस्थांना मात्र टंचाई जाणवतच आहे.
प्रवाशांच्या तपासणीला स्थानकावर फाटा
परभणी : येथील रेल्वेस्थानकावर कोरोना चाचणी केली जात नसल्याने स्थानकावरुन अनेक प्रवासी विना चाचणी जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. एकीकडे प्रशासनाने सर्वांना चाचणी बंधनकारक केली असताना बाहेरगावाहून येणारे नागरिक मात्र चाचणी शिवाय शहरात प्रवेश करीत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
पाण्याअभावी वाळू लागली झाडे
परभणी : जिल्ह्यात गतवर्षी अनेक भागात मोठ्या थाटा-माटात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. मात्र या झाडांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे आतापर्यंत झाडे जगली खरी; मात्र आता उन्हाचा पारा वाढत असून ही झाडे जळू लागली आहेत. प्रशासनाने झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
खासगी वाहतुकीवरच ग्रामस्थांची भिस्त
परभणी : एसटी. महामंडळाने अजूनही ग्रामीण भागात एसटी बससेवा सुरू केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना खासगी वाहतुकीवरच अवलंबून रहावे लागत आहे. जिल्ह्यात एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या असल्या तरी ग्रामीण भागात मात्र अद्यापही पूर्ण क्षमतेने बससेवा चालविली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय कायम आहे.
शहरी भागात शीतगृह सुरू
परभणी : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, शहरात ठिकठिकाणी शीतगृह सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अनेक दुकानदारांनी आईस्क्रीम, कोल्ड्रींक्सचा साठा वाढविला आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी आईस्क्रीमला मागणी वाढत आहे. शीतगृहामध्ये मात्र अजूनही ग्राहकांची संख्या वाढलेली नाही.
महावितरणच्या मोहिमेला ग्राहकांचा प्रतिसाद
परभणी : जिल्ह्यात महावितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने अनेक जण थकबाकी भरण्यासाठी पुढे येत आहेत. मागील काही दिवसांपासून ही मोहीम कडक करण्यात आली असून, थकबाकी न भरल्यास संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित ठेवला जात आहे.
नाट्यगृहाच्या बांधकामाला वेग
परभणी : येथील स्टेडियम परिसरातील बचत भवनच्या जागेत नाट्यगृह उभारले जात असून, हे काम वेगाने केले जात आहे. रात्री उशिरापर्यंत नाट्यगृहाचे बांधकाम सुरू राहत आहे. सध्याचा बांधकामाचा वेग पाहता हे काम मुदतीत पूर्ण होईल, अशी आशा येथील नागरिकांना आहे. सध्या शहरात एकही नाट्यगृह नसल्याने कलावंतांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे हे नाट्यगृह कधी पूर्ण होते, याची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.