लोखंडी खिडकी तोडून घरात प्रवेश; रोख रक्कमेसह ३ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:04 PM2021-08-20T16:04:42+5:302021-08-20T16:06:07+5:30
घराच्यावरच्या बाजूच्या लोखंडी खिडक्या तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला
पाथरी : पहिल्या मजल्यावरील घराची लोखंडी खिडकी तोडून प्रवेश करत रोखरक्कम आणि सोनेचांदीचे दागिने चोरीची घटना गुरुवारी पहाटे बाभळगाव येथे घडली. चोरट्यांनी 3 लाख 33 हजार 237 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी 20 ऑगस्ट रोजी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी तालुक्यात चोऱ्याचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी शहरात एकापाठोपाठ तीन चोऱ्याच्या घटना घडल्या होत्या. त्याचा उलगडा अद्याप झाला नाही. दरम्यान, बाभळगाव येथे चिंतामणी अप्पासाहेब गिराम यांच्या घरी धाडशी चोरी झाली. घराच्यावरच्या बाजूच्या लोखंडी खिडक्या तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला, शेतातील तूर विकून आलेले 1 लाख 65 हजार रोकड रक्कम आणि 1 लाख 86 हजार 237 रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने असा 3 लाख 33 हजार 237 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी 20 ऑगस्ट रोजी दुपारी पाथरी पोलीस ठाण्यात चिंतामणी गीराम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
घटनेनंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल
तालुक्यात चोरीच्या घटना घडल्या नंतर तातडीने गुन्हे दाखल होत नाही. शहरात या पूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेत ही असाच प्रकार घडला होता. दोन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाभळगाव येथील चोरी ची घटना 19 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. मात्र गुन्हा 20 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आला आहे.