सेल्समन बनून घरात शिरला, संधीसाधत केला विनयभंग; आरोपीस चार वर्ष सश्रम कारावास
By राजन मगरुळकर | Published: November 29, 2024 07:10 PM2024-11-29T19:10:12+5:302024-11-29T19:11:10+5:30
चार साक्षीदार तपासण्यात आले; परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत सुनावली शिक्षा
परभणी : शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणातील आरोपीस परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एस. नायर यांनी शुक्रवारी कलम आठ पोक्सोमध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व कलम ४५२ मध्ये एक वर्ष सश्रम कारावास अशी चार वर्ष कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पीडिता व तिची आई ६ ऑगस्ट २०२३ रोजी घरी असताना दुपारी आरोपी गुरमीतसिंग उर्फ रिंकूसियंग रणवीरसिंग टाक हा सेल्समन म्हणून फिर्यादीच्या घरी आला होता. यावेळी त्याने पीडितेचा विनयभंग केला. त्या ठिकाणी पीडिताची आई आली व तिने आरोपीच्या गालावर चापट मारली. तेव्हा आरोपी तेथून पळून गेला. सदर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एस. एस. नायर यांनी आरोपी गुरमीतसिंग उर्फ रिंकूसियंग रणवीरसिंग टाक (३०, रा. गुरुद्वारा गेट क्रमांक सहा, नांदेड) यास कलम आठ पोक्सोमध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास आणि कलम ४५२ भादवीमध्ये एक वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या कलमाखाली सुनावल्याचा आदेश देण्यात आला.
या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गिराम यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, अंमलदार दत्तराव खुने, प्रमोद सूर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
चार साक्षीदार तपासण्यात आले
सदर प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता व तिची आई यांची नायब तहसीलदार यांच्यासमोर झालेली ओळख परेड व पीडिताने आरोपीस कोर्टात ओळखले.