भरपूर पावसानंतरही मेथी १० रुपये, पालक ३० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:27+5:302021-08-12T04:22:27+5:30
परभणी शहरात पाथरी रोडवर फळ, भाजीपाल्याचे बीट मार्केट आहे तर बाजारपेठेत क्रांती चौक भाजी मंडई, कडबी मंडी व काळीकमान ...
परभणी शहरात पाथरी रोडवर फळ, भाजीपाल्याचे बीट मार्केट आहे तर बाजारपेठेत क्रांती चौक भाजी मंडई, कडबी मंडी व काळीकमान परिसरात भाजीपाल्याचे अनेक व्यापारी विक्रीसाठी बसतात. दररोज या ठिकाणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पालेभाज्यासह फळभाज्यांची आवक होते. मागील काही दिवसांत भाजीपाला उत्पादनावर जास्त पाऊस पडल्याने परिणाम झाला आहे. तरी अनेक पालेभाज्यांची आवक वाढली असतानाही दर मात्र कमी होण्याऐवजी आहे तेवढेच आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम झाला आहे.
पालक येतो ग्रामीण भागातून
परभणीच्या बाजारपेठेत होणारी भाजीपाल्याची आवक जिल्ह्यातूनच मोठ्या प्रमाणावर होते. परजिल्ह्यातील भाजीपाला शक्यतो विक्रेते परभणी शहरात आणत नाहीत. येण्या-जाण्याचा खर्च व उत्पादनाचा खर्च पाहता तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने परजिल्ह्यातून भाजीपाला येत नाही. कृषी विद्यापीठातील काही गावांसह सेलू, मानवत तालुक्यांतून भाजीपाला येतो.
गृहिणी म्हणतात...
पावसाळ्यात अनेक भाज्या स्वस्त होतात; परंतु सध्या पालेभाज्या महागच आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजी खरेदीसाठी पैसा खर्च होत आहे. महिन्याच्या भाजीपाला विक्रीसाठी ठेवलेल्या बजेटमध्ये वाढ झाली आहे.
- राजश्री जोशी, गृहिणी.
पालेभाजी अथवा फोडभाजी या दोन्हीचे दर वाढले आहेत. पाव किलो भाजीही २० रुपयांच्या खाली नाही. यामुळे दिवसाला भाजीपाला, कोथिंबीर यावर किमान ५० रुपये खर्च होत आहेत.
- अलका तांबोळी, गृहिणी.
व्यापारी म्हणतात...
सुरुवातीला भरपूर पाऊस झाला तेव्हा भाजीपाला दर कमी होतील असे वाटले होते; परंतु पावसानंतरही दर कायम आहेत. ग्राहक भाजीपाला घेताना घासाघीस करतात. मात्र, आम्हालाच फारसे उत्पन्न हाताला लागत नाही.
- माधव रोडगे, व्यापारी.
भाजी जास्त आल्यानंतर भाव कमी होतात तर उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याची आवक कमी असते. त्यामुळे दर वाढतात; परंतु सध्या पावसाळ्यामध्ये दर ‘जैसे थे’ आहेत.
- सूर्यकांत पिंपरकर, व्यापारी.
पालेभाज्यांचे भाव (प्रति किलो)
भाजी पावसाळ्यापूर्वी सध्या
मेथी ५ रुपये जुडी १० रुपये जुडी
पालक २० ३०
चुका २० ३०
कोथिंबीर २० ४०
पुदिना १० १०