सहा फेऱ्यांनंतरही आठ वाळू घाटांचे लिलाव रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:22 AM2021-04-30T04:22:01+5:302021-04-30T04:22:01+5:30
परभणी : वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला यावर्षी कोरोना आणि संचारबंदीचा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने २२ वाळू घाट ...
परभणी : वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला यावर्षी कोरोना आणि संचारबंदीचा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने २२ वाळू घाट लिलावात ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात लिलावाच्या सहा फेऱ्या पूर्ण करूनही ८ घाटांसाठी कोणीही पुढे आले नाही. परिणामी या घाटांचे लिलाव रखडले आहेत.
दोन वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव होत नसल्याने खुल्या बाजारपेठेतून वाळू गायब झाली होती. त्याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांना सहन करावा लागला. गोदावरी, पूर्णा आणि दुधना या नदीपात्रातील वाळू घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला दरवर्षी मोठा महसूल मिळतो. शिवाय वेळेत लिलाव झाल्यानंतर खुल्या बाजारपेठेत माफक दरात वाळू उपलब्ध होते. त्याचप्रमाणे वाळू चोरीलाही आळा बसतो. मात्र, मागच्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया रखडल्याने बांधकाम व्यावसायिकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या.
अखेर यावर्षी राज्य पर्यावरण समितीने २२ वाळू घाटांचे लिलाव करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने लिलाव प्रक्रिया राबविली. मात्र, लिलावाच्या ६ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही ८ वाळू घाटांसाठी एकही निविदाधारक पुढे आला नाही. त्यामुळे या घाटांचा लिलाव रखडला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. निविदाधारकांसमोरही आर्थिक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. परिणामी वाळू घाटांच्या लिलावासाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सध्या तरी १४ वाळू घाटांचे लिलाव झाले असून, त्यापैकी १२ घाटांमधून वाळूचा उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना बांधकाम व्यावसायिकांना वाळू उपलब्ध होत आहे.
१८ कोटींचा महसूल प्रशासनाच्या तिजोरीत
१४ वाळू घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत १८ कोटी ३९ लाख ६५ हजार १३५ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. वास्तविक २२ वाळू घाटांच्या लिलावातून किमान २५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा होती. परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याने या महसुलात घट झाली आहे.
मानवत तालुक्यातील वांगी वाळू घाटातून प्रशासनाला सर्वाधिक ३ कोटी २१ लाख ५९ हजार ५७६ रुपयांचा महसूल मिळाला. त्याखालोखाल गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील वाळू घाट २ कोटी १६ लाख ९१ हजार ४६८ रुपयांना गेला. सोनपेठ तालुक्यातील पोहंडूळ येथील वाळू घाट १ कोटी २७ लाख ४८ हजार ३०, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील वाळू घाट १ कोटी ६५ लाख ७७ हजार ७७७ रुपयांना लिलावात गेला आहे.
अखेर अपसेट प्राईज केली कमी
वाळू घाटांच्या लिलावाला प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाने २५ टक्के अपसेट प्राईज कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यास केवळ २ घाटांसाठी निविदाधारकांकडून प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव सारंगी येथील वाळू घाट ९१ लाख ९४ हजार ४४६ रुपयांना तर गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला येथील वाळू घाट ७५ लाख ९२ हजार ६११ रुपयांना लिलावात गेला आहे.