अनलॉक नंतरही मजुरांचे हात रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:13 AM2021-06-21T04:13:55+5:302021-06-21T04:13:55+5:30

शहरातील शनिवार बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी मजूर, बांधकाम करणारे मिस्त्री, प्लंबर, खोदकाम करणारे कामगार यांचा दररोज सकाळी ...

Even after unlocking, the hands of the workers are empty | अनलॉक नंतरही मजुरांचे हात रिकामेच

अनलॉक नंतरही मजुरांचे हात रिकामेच

Next

शहरातील शनिवार बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी मजूर, बांधकाम करणारे मिस्त्री, प्लंबर, खोदकाम करणारे कामगार यांचा दररोज सकाळी राबता असतो. या ठिकाणी एकत्रित जमणाऱ्या मजुरांच्या हाताला बांधकामाच्या साईटवर छोटे-मोठे काम करण्यासाठी गुत्तेदार किंवा मुकादम, कंत्राटदार येथे येतात. ते आवश्यक असलेले कामगार निवडून त्यांना रोजचा भत्ता ठरवून काम देतात. मागील एक वर्षापासून मजुरांच्या हाताला कोरोनाच्या लाॅकडाऊनने काम मिळाले नाही. यानंतर सध्या जिल्हा अनलाॅक झाला आहे. यामुळे येथे दररोज शेकडो मजूर हाताला काम मिळेल, या आशेवर एकत्र येत आहेत, परंतु मजुरांची संख्या हजारात तर कामांची संख्या शंभरात अशी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, येथे दिवसभर थांबूनही ५० ते १०० जणांच्या हाताला काम लागत आहे. बाकी मजुरांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.

अशी आहे मजुरांची संख्या

एकूण मजूर - १ हजार

खोदकाम करणारे - १५० ते २००

मिस्त्री - २०० ते २५०

प्लंबर - २०० ते २५०

पेंटर, काँक्रीट काम करणारे - २००

इतर कामगार - १५० ते २००

काम मिळाल्यास दिवसाला ५०० रुपये

येथे जमणाऱ्या कामगार किंवा मजुरांच्या हाताला जर काम मिळाले तर त्यांना दिवसाला त्यांच्या कामाच्या स्वरुपानुसार किमान ५०० ते ६०० रुपये दिले जातात.

मजूर हजारात काम शंभरात

येथे दररोज कामाच्या अपेक्षेने येणाऱ्या मजुरांची संख्या जवळपास १ हजार आहे; मात्र यातील फारतर १०० जणांना काम मिळते. बाकी अनेक जण कमी पैशांत तरी काम मिळेल याची प्रतीक्षा करत अर्धा दिवस येथेच वाट पाहतात. काम न मिळाल्यास तसेच घरी परततात.

लेबर कार्डची माहितीच नाही

कामगार कार्यालयाकडे नोंदणी केल्यावर मिळणाऱ्या लेबर कार्डची अनेक मजुरांना माहितीच नसल्याचे दिसून आले. यातील फार तर १५० जणांकडे कार्ड असेल, असे मजुरांनी सांगितले. मूळ कामगार नसलेल्या काही जणांनी लेबर कार्ड काढून शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेतल्याचे मजुरांनी सांगितले. खरे कामगार कार्डपासून वंचित आहेत, अशी माहिती काही कामगारांनी दिली.

घरी मुलांसाठी जे अंगणवाडीचे धान्य मिळते व रेशनचे धान्य मिळते, त्यावर उदरनिर्वाह सुरु आहे. इथे येऊन हाताला काम मिळेल, अशी अपेक्षा असते; पण आठ दिवसांत एकदाही काम मिळाले नाही.

- बालाजी सलगर, मल्हार नगर.

आठवड्यातून तीन ते चार दिवस काम मिळाले तर मिळते. लाॅकडाऊनने सगळे उत्पन्न बंद झाल्याने आता कामाची गरज आहे. शासनाच्या लेबर कार्डची अद्याप नोंद झालेली नाही. यामुळे कोणता लाभही मिळत नाही. - लक्ष्मीबाई सीताराम धोंगडे, खंडोबा बाजार.

जवळा बाजार येथून परभणीत काम मिळेल, या आशेवर पैसे खर्चून येतो. पण येथे बांधकाम असो की अन्य कोणतेही काम हे अगदी मोजक्याच मजुरांना मिळत आहे. यामुळे शेकडो महिला व पुरुष कामाची प्रतीक्षा करत येथेच दिवस घालवतात. - परसराम सोनवणे, जवळा बाजार.

Web Title: Even after unlocking, the hands of the workers are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.