अपुऱ्या साधनांवरही ६०० रुग्णांना केले कोविडमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:05+5:302021-04-26T04:15:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयटीआय रुग्णालयाला पर्याय म्हणून येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयटीआय रुग्णालयाला पर्याय म्हणून येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीत केवळ १० खाटांवर सुरू असलेल्या रुग्णालयात एका महिन्यात सुमारे सहाशे रुग्णांना कोविडमुक्त करण्यात आले. ही कामगिरी जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.
येथील आयटीआय परिसरातील कोविड रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढल्याने या रूग्णालयाला पर्यायी अद्ययावत रुग्णालय उभारण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या जागेचा पर्याय निवडण्यात आला. यासाठी जागा तर उपलब्ध झाली; परंतु वैद्यकीय कर्मचारी आणि ऑक्सिजन बेडसह इतर सुविधांचा अभाव असल्याने सुरुवातीला अनेक अडचणी निर्माण झाल्या. या सर्व अडचणींवर मात करत २४ मार्च रोजी १० रुग्णांवर जिल्हा परिषदेच्या इमारतीत उपचार सुरू करण्यात आले. ऑक्सिजनची सुविधा नसल्याने याठिकाणी केवळ १५ ते २० ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांवरही उपचार सुरू झाले. हळूहळू या ठिकाणची यंत्रणा विकसित करण्यात आली. सध्या येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारला जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञ, फार्मसिस्ट, परिचारिका, आदी मनुष्यबळही निर्माण करण्यात आले. सध्या या रुग्णालयात २८० रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रत्येक आठवड्यात वाढवल्या सुविधा
येथील जिल्हा परिषदेची नवीन इमारत पाच मजली आहे. सुरुवातीला पहिल्या मजल्यावर १० खाटा टाकून उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर दुसरा, तिसरा आणि आता चौथ्या मजल्यावरही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या चार मजल्यांवर सुमारे ३०० ऑक्सिजन खाटा तयार करण्यात आल्या असून, अत्यवस्थ रुग्णांवरही आता उपचार केले जात आहेत.
ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी
जिल्हा परिषद रुग्णालयाच्या परिसरात हवेतून ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसात प्रकल्प पूर्ण होऊन रुग्णांना मुबलक ऑक्सिजन उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक उत्तम आणि दिलासा देणारा पर्याय ठरत आहे.
महिनाभरात ६३१ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयातून महिनाभरात ६३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे, अत्यवस्थ रुग्णांनाही बरे करून त्यांना घरी पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी आणि इतर अशा २०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिवस-रात्र रुग्णांना सेवा दिली जात आहे. जास्तीत जास्त रुग्णांना कोरोनामुक्त करण्यावर आमचा भर असल्याचे या कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय मस्के यांनी सांगितले.