शिवशाही बसेसही सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:22 AM2021-09-07T04:22:51+5:302021-09-07T04:22:51+5:30
परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेनंतर एसटी महामंडळाची सेवा पूर्ववत झाली असून, जिल्ह्यात दोन मार्गांवर १० शिवशाही बसेसच्या फेऱ्या केल्या जात ...
परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेनंतर एसटी महामंडळाची सेवा पूर्ववत झाली असून, जिल्ह्यात दोन मार्गांवर १० शिवशाही बसेसच्या फेऱ्या केल्या जात आहेत. या माध्यमातून महामंडळाच्या उत्पन्नात भर पडली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे दोन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाची सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर, जून महिन्यात महामंडळाने बससेवा सुरू केली. हळूहळू आता प्रवाशांची गर्दीही वाढू लागली असून, एसटी महामंडळाने बंद केलेल्या सेवा सुरू केल्या आहेत.
प्रवाशांचा प्रवास आरामदायक व्हावा, यासाठी महामंडळाने दोन वर्षांपूर्वी शिवशाही बसेस सुरू केल्या होत्या. या बसेसचे प्रवासी भाडे इतर बससेवेच्या तुलनेत अधिक आहेत. आता ही बससेवाही सुरू करण्यात आली असून, परभणी जिल्ह्यातून दोन मार्गांवर १० बसेस चालविल्या जात आहेत. विशेष म्हणजे, अद्यापही १० बसेस बंद आहेत.
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक व्हावा, यासाठी महामंडळाने शिवशाही बससेवा सुरू केली आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या धर्तीवर या बसेस आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी शिवशाही बसने प्रवास करण्यासाठी प्रवाशी प्राधान्य देत असे. विशेषत: लांब पल्ल्याच्या मार्गावर या बसेस चालविल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बसगाड्यांचीही विशेष काळजी घेतली जात असून, बसचे संपूर्ण सॅनिटायझेशन करूनच बस स्थानकात आणली जाते, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
निम्म्या बसेस बंदच...
जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा पूर्वपदावर आली असली, तरी लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांची संख्या अजूनही वाढलेली नाही. त्यामुळे परभणी- बीड आणि परभणी-पुणे या दोनच मार्गांवर शिवशाही बस चालविल्या जात आहेत. परभणी-बीड मार्गावर ६ बसगाड्यांच्या ३ फेऱ्या आणि परभणी-पुणे मार्गावर ४ बसगाड्यांच्या २ फेऱ्या केल्या जात आहेत.