सर्वांना कोरोनाची लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पहावी लागणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:30 AM2021-02-18T04:30:46+5:302021-02-18T04:30:46+5:30
१६ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोरोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध झाली. ९ हजार ३३३ डोसेस जिल्ह्याला मिळाले असून, हेल्थ वर्कर आणि ...
१६ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोरोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध झाली. ९ हजार ३३३ डोसेस जिल्ह्याला मिळाले असून, हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर अशा १४ हजार ५९६ जणांची लस मिळण्यासाठी नोंदणी केली आहे. लस प्राप्त होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच या संदर्भात उदासिनता दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ ६ हजार ४२९ नागरिकांनीच ही लस घेतली आहे. त्याची टक्केवारी ४३.३ टक्के एवढीच आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची टक्केवारी ५८ टक्के तर फ्रंट लाईन वर्करच्या लसीकरणाची टक्केवारी २१.४ टक्के एवढीच आहे. लसीकरणाचा हा वेग पाहता, जिल्ह्यातील सर्वांसाठी लस उपलब्ध होण्यासाठी किमान वर्षभराची प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते.
आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच उदासिनता
कोरोनाची उपलब्ध झालेली लस सुरक्षित आहे की नाही, याविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच संदिग्धता आहे. त्यामुळे कर्मचारी लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्याचप्रमाणे कोणताच त्रास जाणवत नसेल तर लस का घ्यायची? असेही काही जणांना वाटते. तर कोरोना काळात कोरोना झाला नाही म्हणजे ॲन्टीबॉडीज् तयार झाल्या आहेत त्यामुळे लसीची आवश्यकता नाही, अशी काही जणांची धारणा झाली आहे. त्यामुळे लस उपलब्ध होऊनही ती घेण्यासाठी कर्मचारी पुढे येत नाहीत. परिणामी लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
४०० जणांना रोज दिली जाते लस
६४२९
जणांनी आतापर्यंत घेतली लस
दहा दिवसांत १४५ रुग्ण
जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मागील आठवड्यात एक आकडी रुग्ण संख्या नोंद होत होती ती आता दोन आकड्यांवर आली आहे. दहा दिवसांत १४५ नवीन रुग्णांची भरजिल्ह्यात झाली आहे.