परभणी जिल्ह्यातील २७ मंडळांत अतिवृष्टी; पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 05:58 PM2021-09-09T17:58:52+5:302021-09-09T18:00:33+5:30
जिल्ह्यातील येलदरी आणि निम्न दुधना हे दोन मोठे प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत
परभणी : जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून, सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक १०६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गंगाखेड तालुक्यात १०० मिमी, पालम १०३ मिमी, सोनपेठ ६७.९, परभणी ६७.७ आणि मानवत तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात एकूण ५२ मंडळे असून, त्यापैकी २७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आहेत. नदीकाठावरील पिकांचा आकडा मोठा आहे. जिल्ह्यातील येलदरी आणि निम्न दुधना हे दोन मोठे प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले असून, येलदरी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडले असून, निम्न दुधना प्रकल्पाच्या १६ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे.
हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या
पुराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू
मासोळी, करपरा या दोन मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवरील बंधारे १०० टक्के भरले आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार पुराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच लहान ७२ आणि मोठी १९ जनावरे दगावली आहेत. ग्रामीण भागातील १०६१ घरांची पडझड झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे ४० ते ५५ गावांचा संपर्क सध्या तुटलेला आहे. गंगाखेड, पालम भागात प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.