परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २७ मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:13+5:302021-09-09T04:23:13+5:30

परभणी : जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून, सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक १०६ ...

Excessive rainfall in 27 circles in six talukas of Parbhani district | परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २७ मंडळांत अतिवृष्टी

परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २७ मंडळांत अतिवृष्टी

googlenewsNext

परभणी : जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून, सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक १०६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गंगाखेड तालुक्यात १०० मिमी, पालम १०३ मिमी, सोनपेठ ६७.९, परभणी ६७.७ आणि मानवत तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण ५२ मंडळे असून, त्यापैकी २७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आहेत. नदीकाठावरील पिकांचा आकडा मोठा आहे.

जिल्ह्यातील येलदरी आणि निम्न दुधना हे दोन मोठे प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले असून, येलदरी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडले असून, निम्न दुधना प्रकल्पाच्या १६ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. मासोळी, करपरा या दोन मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवरील बंधारे १०० टक्के भरले आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार पुराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच लहान ७२ आणि मोठी १९ जनावरे दगावली आहेत. ग्रामीण भागातील १०६१ घरांची पडझड झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे ४० ते ५५ गावांचा संपर्क सध्या तुटलेला आहे. गंगाखेड, पालम भागात प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

Web Title: Excessive rainfall in 27 circles in six talukas of Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.