परभणी जिल्ह्यात चौदा मंडळांत अतिवृष्टी; झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंद, अनेक गावे संपर्काबाहेर
By राजन मगरुळकर | Published: July 13, 2022 06:59 PM2022-07-13T18:59:19+5:302022-07-13T18:59:54+5:30
परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक बुधवारी सकाळपासून बंद झाली आहे.
-राजन मंगरुळकर
परभणी : जिल्ह्यात बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे १४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये पूर्णा आणि पालम तालुक्यातील प्रत्येकी पाच मंडळांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी ५७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे तीन दरवाजे उघडून ५२ हजार २१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. याशिवाय तालुक्यातील आरखेड जिल्हा परिषद शाळेची भिंत व शिरपूर येथील दोन घरे पडल्याची घटना घडली आहे. सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीच्या पुराच्या पाण्यामुळे उक्कडगाव, वडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगापिंपरी, गोळेगाव या गावातील वाहतूक ठप्प पडली आहे. सेलू तालुक्यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडल्याने निम्न दुधना प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले असून, बुधवारी सायंकाळी पाच वाजता २३६७ क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सद्य:स्थितीत दुधना प्रकल्पात ७०.६२ टक्के जिवंत पाणीसाठा निर्माण झाला आहे.
झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंद
परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक बुधवारी सकाळपासून बंद झाली आहे. माटेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग सायंकाळपर्यंत बंद होता. तसेच पालम तालुक्यातील ३० गावांचा संपर्क तुटला होता. तर गंगाखेड तालुक्यातील दहा गावांचा संपर्क इंद्रायणी नदीच्या पुलावर पाणी आल्याने तुटला आहे.