उपजिल्हा रुग्णालयात शंभर खाटांपर्यत विस्तारिकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:48 AM2021-02-20T04:48:57+5:302021-02-20T04:48:57+5:30
सेलू : येथील उपजिल्हा रूग्णालयात ५० खाटांवरून १०० खाटांपर्यंत विस्तारिकरण करणे व या संबधी आवश्यक सर्व आरोग्य सेवा ...
सेलू : येथील उपजिल्हा रूग्णालयात ५० खाटांवरून १०० खाटांपर्यंत विस्तारिकरण करणे व या संबधी आवश्यक सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्र्यांकडे शुक्रवारी सेलू तालुका विकास कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील सेलू हे उपजिल्ह्याचे ठिकाण असून या शहराची वाढती लोकसंख्या तसेच उपजिल्हा रूग्णालयात येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता सद्य परिस्थितीत असलेली ५० खाटांची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयांतर्गत वालुर,देऊळगाव गात तसेच चिकलठाणा हे तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या ठिकाणांवरून तसेच मानवत,पाथरी,मंठा,जिंतूर,परतुर व माजलगाव आदी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी सेलू उपजिल्हा रूग्णालयाकडे येतात. येथील उपजिल्हा रूग्णालयात खाटांचे प्रमाण निम्यापेक्षा कमी असल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. यासाठी उपजिल्हा रूग्णालयात शंभर खाटांची व्यवस्था करावी, अशी या भागातील जनतेची मागणी आहे. जनतेचा आरोग्य विषयक प्रश्न असून याची तत्काळ दखल घेऊन ५० खाटांवरून १०० खाटांचा प्रलंबित असलेला श्रेणीवर्धन प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, अशी मागणी सेलू तालुका विकास कृती समितीच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली आहे.