८४८ ईटीआय मशीनसाठी दरमहा ४ लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:31 AM2021-03-04T04:31:27+5:302021-03-04T04:31:27+5:30
परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारांत प्रवाशांचे तिकीट फाडण्यासाठी ८४८ ईटीआय मशीनचा वापर करण्यात येतो. या ...
परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारांत प्रवाशांचे तिकीट फाडण्यासाठी ८४८ ईटीआय मशीनचा वापर करण्यात येतो. या मशीनला किरायापोटी एसटी महामंडळाला दर महिन्याला जवळपास ४ लाख रुपये अदा करावे लागत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी हा खर्च मारक ठरत आहे.
परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी, तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळनमुरी व हिंगोली या सात आगारांंचा समावेश होतो. या सात आगारांत ४१० बसच्या माध्यमातून प्रवाशांची ने-आण करण्यात येते. यासाठी ८४० वाहक व चालक कार्यरत आहेत. प्रवाशांना नियोजित स्थळी जाण्यासाठी वाहकांकडून तिकीट देण्यात येते. मात्र, हे तिकीट फाडण्यासाठी आवश्यक असलेली ईटीआय मशीन ही किरायाची वापरण्यात येते. या सात आगारांसाठी ८४८ मशीन संबंधित कंपनीकडून घेण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत ४३३ मशीन कार्यरत असून, ४१५ मशीन नादुरुस्त अवस्थेत आहेत. मशीन पुरवठा करणाऱ्या एजन्सीला प्रति तिकिटामागे ३५ पैशांचे भाडे अदा केले जाते. जवळपास २०१० पासून या मशीन एसटी महामंडळात कार्यरत आहेत. त्यामुळे दरमहा जवळपास ४ लाख रुपये, तर आतापर्यंत २ कोटी ८० लाख रुपयांची देयके संबंधित एजन्सीला या मशीनच्या भाड्यापोटी अदा करण्यात आले आहेत. एकीकडे राज्य शासन एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे एसटी महामंडळाच्या भाड्यापोटी घेतलेल्या ईटीआय मशीनच्या किरायापोटी वर्षाकाठी लाखो रुपये माेजावे लागत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी ईटीआय मशीनचा किराया मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
२१ हजारांच्या मशीनसाठी लाखाेंचा किराया
बालाजी कंपनीकडून या मशीन एसटी महामंडळाला पुरविल्या जातात, तर ट्रायमॅक्स कंपनीकडून या मशीनची दुरुस्ती व देखभाल करण्यात येते. विशेष म्हणजे या मशीनची किंमत बाजारात जवळपास २१ हजार रुपये आहे. मात्र, एसटी महामंडळ २०१० पासून या मशीन किरायाने वापरते. एका महिन्याच्या किरायात एसटी महामंडळाला आवश्यक असलेल्या मशीन खरेदी करता आल्या असत्या. मात्र, त्याकडे महामंडळ प्रशासनाने दुर्लक्ष केले असून, २१ हजारांच्या मशीनसाठी दरमहा लाखोंचा किराया संबंधित एजन्सीला अदा केला जातो. त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन किरायासाठी जात असलेला पैसा वाचून एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरणाऱ्या मशीन खरेदी कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.