वृक्ष लागवडीवरील ५४ लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:23 AM2021-08-18T04:23:34+5:302021-08-18T04:23:34+5:30

पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षात अपरिमित वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे राज्य ...

Expenditure of Rs 54 lakh on tree planting in water | वृक्ष लागवडीवरील ५४ लाखांचा खर्च पाण्यात

वृक्ष लागवडीवरील ५४ लाखांचा खर्च पाण्यात

Next

पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या काही वर्षात अपरिमित वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहे. त्यामुळे राज्य शासनाने २०१६ पासून वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील काही विभागाने या वृक्ष लागवडीचा केवळ सोपस्कार पार पडल्याचे दिसून येते. सेलू येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालयाने २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुतर्फा रोपवन करण्यासाठी मोरेगाव ते देगाव फाटा या रस्त्यावर वनीकरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन २ हजार ५०० वृक्षाची लागवड केली. ३१ मार्च २०२० रोजी या झाडाची उंची दोन मीटर झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. विशेष म्हणजे या पाच किमी रस्त्यावर १३ लाख १० हजार ५४० रुपयांचा खर्च वृक्ष लागवडीवर करण्यात आला. मात्र सोमवारी केलेल्या पाहणीत या रस्त्यावर केवळ शंभर झाडे जगताना दिसून आले. तर दुसरीकडे याच विभागाने देऊळगाव गात ते लाडनांद्रा फाटा या पाच किमी रस्त्यावर २०१७ च्या पावसाळ्यात २ हजार ५०० झाडे लावली. या झाडांचे संगोपन केल्यानंतर ३१ मार्च २०२० पर्यंत १ हजार ५५५ झाडे त्यांची उंची दोन मीटर झाल्याचे दाखविण्यात आले. परंतु या रस्त्यावर २००हून कमी झाडे दोन मीटरपेक्षा जास्त उंचीची असल्याचे दिसून आले. मात्र या वृक्ष लागवडीच्या संगोपनासाठी १२ लाख ८० हजार ९४८ रुपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरही सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीवर केलेला खर्च केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी होता की काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

रोपांच्या संगोपनाकडे केले दुर्लक्ष

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सेलू ते पाथरी या दहा किमीच्या रस्त्यावर सामाजिक वनीकरण विभागाने २०१६च्या पावसाळ्यात ५००० वृक्षांचे रोपण केले. ३१ मार्च २०१९ रोजी ३ हजार १११ झाडे जगली असून त्यांची उंची ३.५० मीटर एवढी झाल्याचे दाखविण्यात आले. या वृक्ष लागवडीवर सामाजिक वनीकरण विभागाने सर्वाधिक २८ लाख १६ हजार १४६ रुपयांचा खर्च केला असून, सद्यस्थितीत या रस्त्यावरही केवळ २ हजारच्या आसपासच झाडे जगली असल्याचे दिसून आले. त्यामुळे सेलू येथील सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यातील तीन रस्त्यांवर वृक्ष लागवडीसाठी केलेला ५४ लाख ७ हजार ६३४ रुपयांचा खर्च संगोपनाअभावी पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Expenditure of Rs 54 lakh on tree planting in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.