पाथरीत हॉटेलचालकाने तयार केली नगरपालिकेची बनावट कागदपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 07:47 PM2018-03-01T19:47:33+5:302018-03-01T19:47:39+5:30
नगरपालिकेची बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयातील एका प्रलंबित प्रकरणात सादर केल्या प्रकरणी पाथरी येथील एका हॉटेलचालकावर नगरपालिकेच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी : येथील नगरपालिकेची बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयातील एका प्रलंबित प्रकरणात सादर केल्या प्रकरणी पाथरी येथील एका हॉटेलचालकावर नगरपालिकेच्या तक्रारीवरून २७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी शहरातील बसस्थानकासमोर नगरपालिकेच्या शहराला पाणीपुरवठा करणार्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. या ठिकाणाहून विविध भागात पाईपलाईन गेली आहे. या पाईपलाईच्या जागेवर माजी उपनगराध्यक्ष अली अफसर अन्सारी हे सदस्य असताना या भागात हॉटेलचे बांधकाम केले आहे. पाईपलाईन या जागेवरून जात असल्याने नगर पालिकेने ही हॉटेल पाडण्याची कारवाई केली होती. सध्या हे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे हॉटेल पाडण्याची कारवाई थांबली.
अली अफसर अन्सारी यांनी त्यांच्या सदस्य पदाच्या कार्यकाळात त्या हॉटेलखाली पाईपलाईन नसल्याचे नगरपालिकेचे कागदपत्र तयार करून न्यायालयात दाखल केले. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू असताना ज्या जागेत नगरपालिकेचे पाईपलाईन आहे, त्या जागेत पाईपलाईन नसल्याचे कागदपत्रे सादर केली गेली असल्याचे समोर आले. या प्रकरणी पालिका प्रशासनाने कागदपत्रे तपासली असता ती कागदपत्रे खोटे आणि बनावट असल्याचे दिसून आले. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक मुशिरुद्दीन जाहीरोद्दीन फारोखी यांनी हॉटेलमालक अली आदेल अकबर अन्सारी व अली अन्सर अकबर अन्सारी यांच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात नगरपालिकेच्या दोन संशयित कर्मचार्यांवर आरोप करण्यात आला असल्याने ते दोन कर्मचारी कोण आहेत? हे चौकशीतून पुढे येणार आहे.
पालिकेतील दोन कर्मचार्यांवर संशय
पाथरी नगर पालिकेची बनावट कागदपत्रे तयार करून ती न्यायालयात सादर केल्याची बाब समोर आल्यानंतर पालिकेने या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या अनुषंगाने नगरपालिकेतील दोन कर्मचार्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. ते दोन कर्मचारी कोण? याबाबत शहरात चर्चा होत आहे.