पाथरीत तालुक्यात पुरात कुटुंब अडकले; पिकांचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 05:12 PM2019-10-25T17:12:35+5:302019-10-25T17:13:57+5:30
वाघाळा गाव परिसरात वास्तव्यास असलेले आदिवासी कुटुंब रात्री पुरात अडकून पडले.
पाथरी : गुरुवारी (दि. २४ ) सायंकाळी तब्बल चार तास झालेल्या मुसळधार पावसाने पाथरी तालूक्यातील नदी-नाल्यांना पूर आला, त्यामुळे शेतामध्ये खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाघाळा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावचा रस्ता बंद पडला. तसेच वाघाळा गाव परिसरात वास्तव्यास असलेले आदिवासी कुटुंब रात्री पुरात अडकून पडले. तर वडी येथील पुलाला पाणी आल्याने हा रस्ता ही बंद पडला होता.
24 ऑक्टोबर रोजी दिवसभर सकाळपासून पावसाची रिपरिप चालू होती. दुपारनंतर पावसाने विसावा घेतला मात्र सायंकाळी सहानंतर जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पाथरी तालुक्यामध्ये अतिवृष्टीची झाली. तालुक्यात 83.33 मीमी पाऊस झाला. पाथरी तालुक्यात पावसाने आधीच वार्षीक सरासरी ओलांडली आहे. काल झालेल्या पावसाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बीमध्ये पेरणी झालेल्या ज्वारी पिकाचे नुकसान झाले . त्यामुळे रब्बी पेरणीतील पिकांनाही याचा फटका बसणार आहे . खरिपातील काढणीस व वेचणीस आलेल्या सोयाबीन, कापुस पिक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने करावेत व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पुरात कुटुंब अडकले
ग्रामीण भागांमध्ये नदीनाल्यांना पूर आल्याने गाव नदीकाठावरील शेत शिवारामध्ये पाणी घुसल्याने जमीन वाहून गेली. पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये चिल्लारीच्या काटेरी झाडापासून कोळसा निर्मिती करणारे काही आदिवासी नदी पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते .पुराच्या पाण्यात रात्रभर राहील्यानंतर ते सकाळी सुखरूप बाहेर पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
पुरामुळे अनेक रस्ते बंद
नदी पुलावरून पाणी वाहत असल्यांने सकाळी दहा वाजेपर्यंत तालुक्यातील वाघाळा, मुदगल, फुलारवाडी आदी गावातील लोकांचा तुटला होता. मुदगल जाणारी बस वाघाळा पुला पासून परत आली. तसेच वडी शिवारात पाणी वाढल्याने निवळी पाटोदा , गोपेगाव वाहतूक बंद होती, पुलाला पाणी असल्याने निवळी बस वडी येथून परत आली. खेरडा शिवारात अशोक सीताफळे यांचे सोयाबीन पाण्यात गेले, तर सारोळा भागात कापलेले सोयाबीन पाण्यात बुडाले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.