बहुविध प्रशालेत विद्यार्थ्यांचा दुष्काळ; कर्मचाऱ्यांचा सुकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:20+5:302021-08-21T04:22:20+5:30
परभणी शहरातील शनिवार बाजार भागात जिल्हा परिषद बहुविध प्रशाला आहे. येथे पाचवी ते दहावीचे मराठी माध्यमाचे वर्ग भरतात. सद्यस्थितीत ...
परभणी शहरातील शनिवार बाजार भागात जिल्हा परिषद बहुविध प्रशाला आहे. येथे पाचवी ते दहावीचे मराठी माध्यमाचे वर्ग भरतात. सद्यस्थितीत पाचवी व सहावीच्या वर्गात एकही विद्यार्थी पटावर नाही. सातवीसाठी ४ विद्यार्थी, आठवीच्या वर्गात ३, नववीच्या वर्गात १७ व दहावीच्या वर्गात १४ अशा ३८ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पाचवी व सहावीकरिता दोन प्राथमिक पदवीधर शिक्षकांची नियुक्ती आहे; परंतु, या दोन्ही वर्गात विद्यार्थीच नसल्याने या दोन शिक्षकांना आपसात गप्पा मारत बसण्याशिवाय कोणतेही काम नाही. माध्यमिकसाठी ३ शिक्षक नियुक्त आहेत. तीनही कार्यरत आहेत. या शाळेत तब्बल १२ शिपायांची पदे मंजूर असून येथे ११ शिपायांची पदे कार्यरत होती. एप्रिलमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातून अंतरजिल्हा बदलीवर सुरेखा उत्तम सोनपीर यांना येथे सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी पदस्थापना दिली आहे. त्यामुळे मंजूर १२ शिपायांचा कोरम येथे पूर्ण झाला आहे. त्यातील प्रत्यक्ष तीनच शिपाई या शाळेवर आहेत. उर्वरित ९ शिपाई हे जि.प. सीईओ, पदाधिकारी आणि मुख्यालयातील कामकाज आदी ठिकाणी नियुक्तीवर आहेत.
या शाळेत एक लिपिकाचे पद मंजूर असून लिपिकही कार्यरत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या शाळेत पाथरी येथून आवश्यकता नसताना वैजनाथ मुंडलिक या प्रयोगशाळा सहायक कर्मचाऱ्याची येथे बदली करण्यात आली आहे. येथील प्रयोगशाळेची प्रत्यक्ष शुक्रवारी पाहणी केली असता कित्येक वर्षांपासून या प्रयोगशाळेचे कुलूप उघडले नव्हते. आतमध्ये विज्ञान साहित्याऐवजी अडगळीत टाकलेले जुने साहित्य, जाळे जळमटे दिसून आले. या शाळेची परिस्थिती प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना माहीत असताना केवळ सोयीची व्यक्तीची वर्णी लावण्यासाठी येथे पदस्थापना देण्यात येत असल्याची चर्चा शिक्षा वर्तुळात सुरू आहे.
उर्दू माध्यमात ८७ विद्यार्थी
या शाळेत उर्दू माध्यम विभाग स्वतंत्र्यरित्या आहे. येथे पाचवीसाठी ११, सहावी १७, सातवी १७, आठवी १४, नववी ११ आणि दहावीसाठी १७ अशी ८७ पटसंख्या आहे. येथे प्राथमिक १, पदवीधर २ आणि माध्यमिकचे ३ शिक्षक व एक लिपिक कार्यरत आहे. एक शिक्षिका गेल्या दोन वर्षांपासून रजेवर आहे.