तीन महिन्यांपासून खरेदी केंद्रांना शेतमालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:31+5:302020-12-15T04:33:31+5:30
परभणी : केंद्र शासनाने आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने पणन महासंघामार्फत २०२०-२१ साठी मूग, उडीद व सोयाबीनच्या शेतमाल खरेदीसाठी ...
परभणी : केंद्र शासनाने आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने पणन महासंघामार्फत २०२०-२१ साठी मूग, उडीद व सोयाबीनच्या शेतमाल खरेदीसाठी १५ सप्टेंबरपासून हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. मात्र, खाजगी बाजारातील भाव वरचढ ठरत असल्याने तीन महिन्यांपासून या खरेदी केंद्रात एकाही शेतकऱ्याने आपला शेतमाला विक्रीस आणला नाही. पणन महासंघाच्या वतीने खरीप हंगाम २०२०-२१ मधील सोयाबीन, मूग, उडीद हा शेतमाल हमीभावात खरेदी करण्यासाठी जिंतूर तालुक्यातील बोरी व सेलू येथे तुळजाभवानी कृषीविकास सेवा संस्थेच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू केले. त्याचबरोबर जिंतूर येथे जिंतूर तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था, पूर्णा येथे तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, पाथरी येथे स्वास्तिक सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, सोनपेठ येथे स्वप्नभूमी सुशिक्षित सहकारी संस्थेच्या माध्यमातून दी मानवत खरेदी-विक्री संघ तर गंगाखेड येथे गंगाखेड खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी केंद्र १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले. मात्र, खाजगी बाजारातील भाव वरचढ ठरल्याने या खरेदी केंद्राकडे तीन महिन्यांपासून एकही शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी फिरकला नाही. त्यामुळे तीन महिन्यांपासून या हमीभाव खरेदी केंद्रांना शेतमालाची प्रतीक्षा असल्याचे दिसत आहे.