शेळ्यांनी तूर खाल्ल्याने शेतमालकाकडून एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:07 PM2019-03-15T15:07:52+5:302019-03-15T15:08:27+5:30
गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे.
परभणी- शेतात कापून ठेवलेली तूर शेळ्यांनी खाल्याने एका व्यक्तीचा शेतमालकाने मारहाण करुन खून केल्याची घटना परभणी तालुक्यातील मांडवा येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, परभणी तालुक्यातील मांडवा येथील काशिनाथ मुंजाजी पंडित (७२) हे १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातील शेतकरी नितीन यशवंत कदम (२५) यांच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले असता कदम यांनी शेतात कापून ठेवलेल्या गंजीतील तूर शेळ्यांनी खाल्ली. यावरुन नितीन कदम याने काशिनाथ पंडित यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने काशिनाथ पंडित यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत सीता लक्ष्मण पंडित यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी नितीन यशवंत कदम याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी व विविध कलमान्वये पहाटे ४ वाजेच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी एस.एस.परदेसी यांनी गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. घटना घडल्यानंतर आरोपी नितीन कदम हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
गेल्या महिन्यातही आरोपीने केली होती शिवीगाळ
या प्रकरणातील आरोपी नितीन कदम याने गेल्या महिन्यातही मयत काशिनाथ मुंजाजी पंडित यांना शेतातील तुरी बकऱ्यांनी खाल्ल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्या घटनेचाही राग मनात धरुन गुरुवारी नितीन कदम याने काशिनाथ पंडित यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.