परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणकर्त्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ज्ञानेश्वर भाले | Published: February 8, 2024 06:07 PM2024-02-08T18:07:30+5:302024-02-08T18:07:41+5:30
शेतजमिनीचा सर्वे करून सातबारा दुरुस्त करून द्यावा, या मागणीसाठी ते गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण
परभणी : पालम तालुक्यातील उक्कडगाव येथील धनंजय शिंदे या उपोषणकर्त्याने जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यांसह उपस्थितीत नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. शेतजमिनीचा सर्वे करून सातबारा दुरुस्त करून द्यावा, या मागणीसाठी ते गेल्या पंधरा दिवसापासून उपोषण करत आहे. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले हाेते.
शिंदे यांची उकडगाव भागात शेतजमीन असून यातील काही भाग माजलगाव कालव्यामध्ये जात असल्याची स्थिती आहे. यासंबंधी सर्वे करून पोट हिस्सा मोजणीतील क्षेत्रफळ दुरुस्त करून तात्काळ सातबारा द्यावा, यासाठी धनंजय शिंदे हे साधारण गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे. मात्र त्यांना जबाबदार अधिकारी यंत्रणा सकारात्मक प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यादरम्यान उपस्थित पोलीस कर्मचारी, नागरिकांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.