परभणी जिल्ह्यात भीजपावसाने बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:45 AM2018-08-16T11:45:00+5:302018-08-16T11:47:43+5:30
वीस दिवसानंतरच्या मोठ्या खंडानंतर १५ आॅगस्ट रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले आहे.
परभणी : वीस दिवसानंतरच्या मोठ्या खंडानंतर १५ आॅगस्ट रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून, रात्रभर सर्वदूर झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.
रात्रीतून जिल्ह्यात सरासरी २४.६८ मि.मी. पाऊस झाला आहे. पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत होते. सोयाबिन, कापूस ही पिके करपून जात होती. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला होता. त्यामुळे पावसाची नितांत आवश्यकता होती. दरम्यान, थोड्या उशिराने का होईना पण, १५ आॅगस्ट रोजी रात्री पावसाला प्रारंभ झाला.
परभणी शहरात १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपासून पाऊस सुरू झाला. अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर बरसला. १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हा भिज पाऊस आहे. गंगाखेड, सोनपेठ, मानवत, सेलू, पाथरी, जिंतूर आदी भागात प्रथमच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
बुधवारी रात्रभरातून जिल्ह्यात सरासरी २४.६८ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात २५.८८ मि.मी., पालम तालुक्यात ९.६७, पूर्णा ३२.८०, गंगाखेड २५.५०, सोनपेठ २५.००, सेलू २१.८०, पाथरी २४.००, जिंतूर ३०.१७ आणि मानवत तालुक्यात २७.३३ मि.मी. पाऊस झाला.
परभणी परिसरात ५९ मि.मी. पाऊस
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानेही १५ आॅगस्ट रोजी रात्री झालेल्या पावसाची नोंद घेतली आहे. परभणी व परिसरात ५९ मि.मी. पाऊस झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.