कर्ज आणि शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 02:33 PM2021-02-02T14:33:41+5:302021-02-02T14:35:52+5:30
farmer suicide : मृत शेतकऱ्याच्या खिशात आधालेल्या दोन चिठ्या
गंगाखेड: तालुक्यातील पिंप्री (झोला) येथील एका व्यक्तीने खाजगी कर्ज व शेतीच्या वादाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१ ) दुपारी चार वाजेच्या दरम्यान उघडकीस आली होती. याप्रकरणी रात्री उशिरा चौघांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पिंप्री (झोला) येथील रामेश्वर दत्तराव भिसे ( ५१ ) वर्ष यांनी सोमवारी दुपारी परभणी रस्त्यावरील पेट्रोलपंपाच्या मागील शेतात विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांचा मुलगा संदिप रामेश्वर भिसे याने शेत शेजारी अनिल राठोड यांच्या मदतीने दुचाकीवरून त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव मुंडे यांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले.
जमादार रंगनाथ देवकर, पो. ना. एकनाथ आळसे यांनी रुग्णालयात पंचनामा केला. भिसे यांच्या खिशात दोन चिठ्ठया आढळून आल्या. त्यात कर्ज व शेतीच्या वादाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी संदीप रामेश्वर भिसे यांनी सोमवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात ताक्रार दिली. यावरून बाबासाहेब बापूराव कांबळे, लिंबाजी कबाजी उर्फ कबीर भिसे ( दोघे रा. पिंप्री, झोला ), आदेश अजय रुद्रवार व वैभव अजय रुद्रवार ( दोघे रा. गंगाखेड ) अशा चौघांविरुद्ध कलम ३०६ अन्वये मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि विकास कोकाटे हे करीत आहेत.