दुष्काळ आणि नापिकीला कंटाळुन शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 07:31 PM2019-05-10T19:31:40+5:302019-05-10T19:32:14+5:30
गुरुवारी ( दि. ९ ) रात्री ८ वाजता घराबाहेर पडले. ते रात्री घरी परतलेच नाहीत
गंगाखेड (परभणी ) : दुष्काळ आणि नापिकीला कंटाळुन तालुक्यातील पडेगाव येथील एका शेतकऱ्यांने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि. १० ) सकाळी ९ वाजेदरम्यान घडली. धारबा रामभाऊ निरस असे मृत शेतकऱ्याचे नाव असून पडेगाव शिवारात त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला.
तालुक्यात यावर्षी प्रचंड दुष्काळ पडल्याने शेतात पिक पाणी झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. यातच लग्नाला आलेल्या मुलींचे लग्न कसे करायचे या तणावात असलेले पडेगाव येथील धारबा रामभाऊ निरस (५२) गुरुवारी ( दि. ९ ) रात्री ८ वाजता घराबाहेर पडले. ते रात्री घरी परतलेच नाहीत, त्यांचा शोध घेत असतांना आज सकाळी पडेगाव शिवारातील नंदकुमार निरस यांच्या शेतात त्यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजानन सैदाने, पो.ना. प्रल्हाद मुंडे, वसंतराव निळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी नवनाथ रामभाऊ निरस यांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धारबा यांनी स्वतः जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे निरस यांनी म्हटले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे हे करत आहेत.