रस्त्याच्या कामाचे आश्वासन न पाळल्याने शेतकरी आक्रमक; अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या
By राजन मगरुळकर | Published: August 28, 2024 06:39 PM2024-08-28T18:39:35+5:302024-08-28T18:40:03+5:30
मानवत तालुक्यातील भोसा, लोहरा, पोहंडूळ यासह विविध गावातील शेतकऱ्यांनी लोहरा ते मंगरूळ या रस्त्याचे रखडलेले काम करावे, यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिले.
परभणी : मानवत तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या कक्षामध्ये ठिय्या आंदोलन केले. यापूर्वी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन मागणी करून यंत्रणेने आश्वासन देऊनही काम सुरू न झाल्याने विविध गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
मानवत तालुक्यातील भोसा, लोहरा, पोहंडूळ यासह विविध गावातील शेतकऱ्यांनी लोहरा ते मंगरूळ या रस्त्याचे रखडलेले काम करावे, यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिले. मात्र, त्यानंतर आश्वासन देऊनही यंत्रणेकडून काम सुरू करण्यात आले नाही. १५ ऑगस्टपूर्वीच हे आश्वासन मिळाले होते. दररोज होत असलेली गैरसोय लक्षात घेता विविध गावातील ५० ते ६० शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचे कक्ष गाठले. त्या ठिकाणी संबंधित रस्ता कामाची मागणी लावून धरली. सुमारे एक ते दोन तास शेतकऱ्यांनी येथे ठिय्या आंदोलन केले.
त्यानंतर उपविभागीय अभियंता यांच्यामार्फत सदरील रस्ता मोकळा करून पुनर्बांधणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आठ दिवसात तोडगा काढला जाईल, पोलीस संरक्षणात रस्त्याचे काम सुरू करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून घेण्यात येईल, असे यापूर्वी आश्वासन दिले होते. याबाबत त्वरित पावले उचलावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली. ठिय्या आंदोलनात दत्तराव जाधव, बाळासाहेब जाधव, सुनील जाधव, दत्ता राऊत, रामेश्वर जाधव, रोहिदास जाधव यांच्यासह शेतकऱ्यांचा सहभाग होता.