कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:39 AM2017-08-10T03:39:06+5:302017-08-10T08:47:39+5:30
कर्जाचा बोजा आणि पेरणी वाया गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी आत्महत्या करू नये, या भीतीतून एका शेतकºयाच्या मुलीने स्वत:चे जीवन संपविल्याची घटना जवळा झुटा येथे मंगळवारी घडली.
पाथरी (जि. परभणी) : कर्जाचा बोजा आणि पेरणी वाया गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी आत्महत्या करू नये, या भीतीतून एका शेतकºयाच्या मुलीने स्वत:चे जीवन संपविल्याची घटना जवळा झुटा येथे मंगळवारी घडली. मुलीच्या काकांनी सहा दिवसांपूर्वीच नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती.
दोन महिन्यांपासून तालुक्यात पाऊस नसल्याने खरिपाची पेरणी वाया गेली आहे. पिके करपल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासनाच्या कर्जमाफीचा अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी तणावाखाली आहेत. त्यातून जवळा झुटा येथील चंडिकादास झुटे यांनी ३ आॅगस्टला विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांची पुतणी सारिका सुरेश झुटे (१७) हिने ८ आॅगस्टला आत्महत्या केली.
सारिका ही बीड जिल्ह्यातील शिवनी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. पंचमीच्या सणासाठी ती गावाकडे आली होती. आत्महत्येपूर्वी तिने लिहून ठेवलेले पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. आपल्या काकांवर जी वेळ आली तीच वेळ बाबांवर येऊ नये, त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे तिने पत्रात म्हटले आहे. सुरेश झुटे यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. मागील वर्षी एका मुलीचे लग्न झाले आहे. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. ते अजून पूर्णपणे फिटलेले नाही. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा बँकेचे कर्ज आहे.
सारिकाने लिहिलेले पत्र
प्रिय बाबा,
आपल्या भाऊंनी पाच ते सहा दिवसांपूर्वी शेतातील सर्व पीक जळून गेल्याने आत्महत्या केली. आपल्या घरावर कर्जाचा बोजा, त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून पेरणी केली. मात्र सर्व जळून गेले. तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्या वर्षी लग्न झाले. तेच कर्ज अजून फिटले नाही. तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखे करू नये, यामुळे मी माझे जीवन संपविते.
तुमची - सारिका