शेतीचा डॉक्टर : रबी हंगामात आढळणाऱ्या लष्करी अळीसाठी करा हे उपाय -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:33 PM2019-01-04T12:33:45+5:302019-01-04T12:35:42+5:30
मराठवाडा आणि इतर भागात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
- डॉ. पुरुषोत्तम झंवर ( परभणी)
राज्यामध्ये रबी हंगामातील पिकांवर मराठवाडा आणि इतर भागात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
सुरुवातीला अमेरिकेत उद्भवलेली ही अळी काही वर्षांनंतर आफ्रिका आणि आता कर्नाटक राज्यातून सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र भागातून मराठवाड्यातील पिकांवरही आढळत आहे. ज्वारी आणि ऊस हे या अळीचे मुख्य खाद्य आहे. ही पिके आढळली नाही, तर भात, मका पिकावरही अळीचा प्रादुर्भाव होतो. ३.५ ते ४ सें.मी. आकाराची लांबीची ही अळी खादाड म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला छोट्या अळ्या पिकांच्या हिरव्या भागात सापडतात आणि त्या नंतर मोठ्या होऊन पिकाची पाने कुरडतात. पोंग्यात शिरतात. अळीच्या विष्टेवरून तिची ओळख पटते. अळीचा प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतर सुरुवातीलाच खोल नांगरटी करावी. प्राथमिक अवस्थेत अंडे पुंज वेचून बाहेर काढावेत, कामगंध सापळे, प्रकाश सापळे लावावेत.
चारा पिकावर लिंबोळी अर्काची फवारणी करावी, तसेच प्रादुर्भाव अधिक असेल तर ट्रायक्रोग्रामा, टिलेनोमस चिलोनस या परभक्षी कीटकांचे संगोपन करावे. बीटी (बॅसिलस थुरीनजियेन्सीस), नोमुरिया रिलाय या जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी किंवा कार्बोफ्युरॉन ३ टक्के सीजी ३३ किलो प्रति हेक्टर किंवा फोरेट १० टक्के सीजी १० किलो प्रति हेक्टर किंवा थायामिथॉक्झाम १२.६ अधिक लॅमडा साहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी १२५ मि.ली. प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात टाकून फवारणी करण्यात यावी.
(लेखक हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कीटकशास्त्र विभागप्रमुख आहेत.)